Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आरोग्य व्यवस्था ढासळली; गोवरच्या वाढत्या संसर्गामुळं टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

8

मुंबई : मुंबईसह राज्यात गोवराच्या साथीचा चिंताजनक प्रसार होत असून, आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीवर बोट ठेवले जात आहे. ‘गोवराचा राज्यामधील वाढता प्रसार हा ढासळत्या आरोग्यव्यवस्थेचा निर्देशक आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करून तो युद्धपातळीवर राबवण्याची गरज आहे,’ असे मत राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी ‘मटा’शी संवाद साधताना व्यक्त केले.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गुरुवारी साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली गोवर संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची निर्मिती करण्याचे आदेश दिले. वाढता गोवर संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, या संदर्भात डॉक्टरांशी चर्चा केल्यावर त्यांनी एकूणच व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगितले.

शहरी व ग्रामीण या दोन्ही पातळ्यांवर आरोग्यव्यवस्था भक्कम राहावी, यासाठी मूलभूत आरोग्य समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. करोना संसर्गाच्या काळात आरोग्य व्यवस्थेमधील अनेक लंगड्या बाजू पुढे आल्या. त्यावर मलमपट्टी करण्यासाठी करोनासारख्या संसर्गाचा सामना करावा लागला. करोनानंतर आलेली गोवराची साथ ही एकूण बिघडलेल्या सामाजिक स्वास्थ्याची द्योतक आहेच. मात्र, आरोग्य व्यवस्थेने लसीकरणाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे वास्तव मांडणारीही आहे, असे डॉ. साळुंखे म्हणाले.

‘गोवर संसर्ग नियंत्रणात आणणे ही केवळ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची नव्हे तर सांघिक जबाबदारी आहे. आशा, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, शहरविकास विभाग, पालिका प्रशासन, आरोग्य अधिकारी, शहरातील प्रभाग कार्यालये, ग्रामपंचायती या प्रत्येक घटकाने आपली यातील भूमिका चोख बजावायला हवी. मुंबईमध्ये करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर राबवलेल्या उपाययोजनांची दखल ‘मुंबई मॉडेल’ म्हणून घेण्यात आली. गोवर संसर्गाच्या बाबतीमध्ये त्याच पद्धतीचे सांघिक प्रय़त्न करण्याची गरज आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

‘इतर आजारांपासून सावध राहा’

गोवराच्या संसर्गाने बालकांमधील रोडावलेली रोगप्रतिकारशक्ती, लसीकरणाचा अभाव व कुपोषण या तीन गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील कुपोषित मुलांची समस्या अद्याप सुटलेली नाही. आदिवासी व ग्रामीण भागासह शहरी भागामध्येही कुपोषित बालकांची संख्या वाढती आहे. क्षय आजाराचा संसर्ग आहेच, गोवरासारखा आजार नोंदणीकृत असूनही त्याची नोंद केली जात नसेल, तर त्यामागील कारणे शोधायला हवी. खासगी व सार्वजनिक आरोग्ययंत्रणेने एकत्रित येऊन लढायला हवा, याबद्दल त्यांनी आग्रही मत त्यांनी मांडले.

‘लसीकरणातून निसटलेल्यांची नोंद हवी’

करोना काळामध्ये लसीकरणाच्या प्रक्रियेतून जी मुले निसटली, त्यांचा शोध तातडीने घ्यायला हवा. विभिन्न आर्थिक सामाजिक गटातील बालकांमध्ये लसीकरण किती प्रमाणात झाले, याची नोंद होणेही गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

अकोला, बुलढाण्यात गोवरचे पाच रुग्ण

अकोला : मुंबईत गोवराचा प्रादुर्भाव वाढत असतानाच गुरुवारी विदर्भात पाच रुग्णांची नोंद झाली. यात बुलढाणा जिल्ह्यात तीन तर अकोल्यातील दोघांचा समावेश आहे. देऊळगाव राजा आणि बुलढाणा शहरातील संशयित रुग्णांचे पाच नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील तीन नमुने पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. तर अकोल्यातील ४९ संशयित रुग्णांचे नमुने १५ दिवसांपूर्वी मुंबईला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरुवारी मिळाला.

जळगावातही गोवर

जळगाव : मागील काही दिवसांपासून राज्यात गोवराची साथ आली आहे. गोवराची ही साथ आता जळगाव शहरातदेखील पोहचली असून, शहरातील एकाच भागात गोवरचे ११ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. उपचारानंतर ते घरीच असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

करोनानंतर आलेली गोवराची साथ ही एकूण बिघडलेल्या सामाजिक स्वास्थ्याची द्योतक आहेच. मात्र, आरोग्य व्यवस्थेने लसीकरणाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे वास्तव मांडणारीही आहे.

– डॉ. सुभाष साळुंखे

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.