Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
यवतमाळ, दि 3 डिसेंबर, जिमाका:- राज्य शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची आजच मुहूर्तमेढ रोवली आहे. भविष्यकाळात दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या योजनांची निर्मिती करून त्या माध्यमातून दिव्यांगांना सामान्यांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा राहणार आहे. दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून जिल्ह्यातही त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होणार आहे. त्याचा प्रारंभ आज जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग सहाय्य डिजिटल कक्षाचे उद्घाटन करून झाला, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्रातिल पहिल्या डिजिटल दिव्यांग सहाय्य कक्षाचे लोकार्पण तसेच दिव्यांग उन्नती पोर्टलचे उद्घाटन, विविध विभागांच्या योजनांचे लाभ वाटप आज जिल्हा परिषद सभागृह येथे करण्यात आले. यावेळी पालकमंत्री संजय राठोड बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक पवनकुमार बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, चितंगराव कदम तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी विविध विभागाच्या मार्गदर्शन व घडी पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाचा आणि अमृत आवास अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ, तसेच गरजू दिव्यांग व्यक्तींना जिल्हा परिषदमधील पाच टक्के सेंस निधीतुन दिव्यांग सहायता वस्तुंचे वितरण आणि प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तु देण्यात आली. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी गायन आणि नृत्यकलेचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
पालकमंत्री राठोड पुढे म्हणाले , जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग सहाय्य डिजिटल कक्षाच्या निर्मितीमुळे दिव्यांगांची माहिती एकत्रितपणे जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध होईल. दिव्यांगांनी सुद्धा उन्नाती पोर्टलवर सर्व माहिती नोंदवावी. या माहीतीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कोणत्या योजना कार्यान्वित करता येईल याचे नियोजन करता येईल, असे संजय राठोड यांनी म्हणाले.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांचे आरोग्य तपासणी साठी पुढाकार घेऊन 15 डिसेंबरच्या आत आरोग्य तपासणी करण्यात यावी. तसेच जिल्हाधिकारी यांनी दिव्यांग बचत गटासाठी नाविण्यपुर्ण योजना तयार करावी. महिला व शेतकरी बचत गटाला शेतात फवारणीसाठी ड्रोन देऊन त्यांना उत्पन्नाचे साधन देता येईल का याचाही अभ्यास करून योजना तयार कारावी, असेही संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.
‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. सर्व महिलांना आश्वस्त करतो की, यापुढे कोणीही माता भगिनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन दिसणार नाही. गावातील सर्व नागरिकांच्या घरी पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी राबवलेल्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल पालकमंत्री यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले कि, शासकिय योजनांमध्ये दिव्यांगांना प्राथमिकता देण्यात येईल. जिल्हा परिषद विभागाने झेप, आरंभ, महादीप असे महत्वाचे ड्रिम प्रोजेक्ट राबवले, जे महाराष्ट्रातील पायलट प्रोजेक्ट आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदच्या सर्व चमूचे अभिनंदन त्यांनी केले. लोकांच्या जगण्याशी निगडित विभागांनी लोकसेवेचे काम करावे. दिव्यांगांनी आजच्या सादरिकरणातुन आम्हा सर्वांना ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचे काम केले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
श्रीकृष्ण पांचाळ यांनी, दिव्यांगांसाठी जिल्हा परिषदमध्ये सर्व कामांसाठी प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. तसेच दिव्यांग मुले वयाने मोठी झाल्यावर त्यांच्या आई-वडिलांना काळजी घेणे अवघड होते, म्हणुन त्यांना अर्थसहाय्याची योजना यावर्षीपासुन सुरु केली आहे. महादिप योजनेसाठी यावर्षी विद्यार्थी संख्या वाढविण्यात येणार आहे. योजनेमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये प्रेरणादायी वातावरण तयार झाले आहे. महादीप म्हणून तयार करण्यात आलेले पुस्तक मुलांना वाचण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी झेप उपक्रम राबविण्यात येत आहे. आरंभ प्रोजेक्ट राबवलेला यवतमाळ जिल्हयाचा हा पायलट प्रोजेक्ट होता. हा प्रकल्प राबवताना केंद्र शासनाची, युनिसेफची टीम पाहणी करून गेली आणि आता हा प्रकल्प राज्यस्तरावर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्र्यांनी दिव्यांगांसाठी स्वत: मागवली भेटवस्तू
दिव्यांग विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातिल प्राविण्य, संगीत व नृत्याविष्कार बघुन पालकमंत्री संजय राठोड भारावुन गेले. त्यांनी दिव्यांग मुलांना देण्यासाठी स्वतः भेटवस्तू आणण्यास सांगितले. नंतर ती त्यांना स्वहस्ते दिली. पालकमंत्री यांची दिव्यांगांप्रती संवेदनशीलता यातुन प्रकट झाली.
यावेळी स्वच्छता दूत म्हणून कार्यरत असणारी इयत्ता बारावीत शिकणारी कर्णबधिर विद्यार्थ्यांनी खुशी डवरे आणि जोया शेख जहीर या बहु विकलांग मुलीने नृत्य तर बहु विकलांग साक्षी अलोणे हिने ‘जय शारदे वागेश्वरी’ हे गीत सादर केले. या तिनही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने सभागृह अक्षरश: गहिवरले होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक विनय ठमके तर सूत्रसंचालन चंद्रबोधी घायवटे यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले ,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता अभियंता प्रदीप कोल्हे,कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, शिक्षणाधिकारी श्री सूर्यवंशी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी श्रीमती रसाळ, समाज कल्याण अधिकारी श्री चव्हाण इत्यादी विभाग प्रमुख उपस्थित होते.