Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
MNS leader Vasant More | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील आक्रमक आणि प्रमुख चेहरा असलेले वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. अशातच आता वसंत मोरे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मला राज ठाकरे प्रिय असले तरी पक्षातील इतर लोक मला त्रास देत असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
हायलाइट्स:
- वसंत मोरे मनसेतून बाहेर पडण्याच्या तयारीत?
- अजित पवार यांची वसंत मोरे यांना ऑफर
- वसंत मोरे यांचे सूचक वक्तव्य
वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुण्यातील लग्नसमारंभात घडलेला प्रसंग कथन केला. मी लग्नात स्टेजवरून खाली उतरलो आणि रुपाली चाकणकर यांच्याशी बोलत उभा होतो. त्यावेळी दूरवर असलेल्या अजितदादांशी माझी नजरानजर झाली. यानंतर आम्ही दोघेही गर्दीतून वाट काढत एकमेकांपाशी गेलो. तेव्हा दादा म्हणाले की, अजून किती दिवस नाराज. या आम्ही वाट बघतोय. त्याच्यानंतर जातानाही अजित पवार म्हणाले की, वसंतराव मला तुम्हाला भेटायचे आहे. तुम्ही या माझ्याकडे, आपण बोलू. यानंतर अजित पवार निघून गेले, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
या सगळ्या घडामोडींमुळे वसंत मोरे हे मनसेतून बाहेर पडणार, अशा चर्चा सुरु आहेत. याविषयी वसंत मोरे यांना विचारले असता, मी अजूनही मनसेतच असल्याचे त्यांनी सांगितले. मला अजून तरी राजसाहेब प्रिय आहेत. परंतु, आता मला पक्षातील बाकीच्यांचा त्रास जाणवू लागला आहे. पूर्वी जो त्रास होत नव्हता, तो आता जाणवत आहे. मला स्टेजवर बोलवायचे आणि बसवून ठेवायचे, मी काय शो पीस नाही ना, असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी विचारला. त्यांच्या या टीकेचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, वसंत मोरे यांच्या बोलण्याचा एकूण सूर पाहता भविष्यात ते वेगळा विचार करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
वसंत मोरेंचा खंदा समर्थक मनसेतून बाहेर
वसंत मोरे यांचा खंदा समर्थक म्हणून ओळखले जाणारे माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची राज ठाकरे यांनी अलीकडेच पदावरुन हकालपट्टी केली होती. त्यानंतर निलेश माझिरे यांनी आपल्या ४०० कार्यकर्त्यांसह मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. निलेश माझिरे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का, हे पाहावे लागेल. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर निलेश माझिरे आणि वसंत मोरे हे दुसऱ्या पक्षात गेल्यास तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का असले. आजघडीला पुण्यात मनसेकडे वसंत मोरे यांच्याइतका लोकप्रिय चेहरा नाही. मात्र, पक्षातील इतर लोकांशी त्यांचे वारंवार खटके उडताना दिसत आहेत. त्यामुळे आता वसंत मोरे राज ठाकरे यांच्यावरील प्रेमापोटी किती दिवस मनसेत राहणार, हे आगामी काळात पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.