Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
औरंगाबाद दि 5 (जिमाका) सिल्लोड येथे 1 जानेवारी पासून होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व कृषी विभागाच्या विविध योजनेबाबत या महोत्सवात माहिती देण्यात येणार आहे. या महोत्सवांतर्गत 5 ते 10 जानेवारी दरम्यान ‘सिल्लोड महोत्सव’ चे देखील आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाची निर्धारित वेळेत तयारी पूर्ण करून कृषी महोत्सवाच्या सुयोग्य नियोजनासाठी प्रभावी उपाययोजना करा असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सिल्लोड महोत्सवा संदर्भात आढावा बैठक कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, बियाणे तसेच शेतीपूरक व्यवसाय संबंधी मार्गदर्शन मिळावे यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ व तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निश्चितपणे परिवर्तन दिसेल असा विश्वास व्यक्त करीत सिल्लोड येथील कृषी महोत्सव दिशा दर्शक ठरावा यासाठी अधिकारी – कर्मचारी व समनव्यक समितीच्या सदस्यांनी समनव्यातुन एक टीम म्हणून काम करावे असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
कृषि महोत्सवात शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषि योजना उपक्रमांची माहिती, संशोधित कृषि तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोशिल शेतकऱ्यांचे अनुभव, कृषि पुरक व्यवसाय इत्यादींबाबतचे मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. श्री.सत्तार म्हणाले, या प्रदर्शनात कृषि विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी, उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकऱ्यांचा सत्कार, तंत्रज्ञ व विचारवंत यांची भेट घडावी व सामान्य शेतकऱ्यांना शंका निरसण करुन घेता येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे हा या सिल्लोड महोत्सवाचा उद्देश असल्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगून महोत्सवाचे स्वरुप, महोत्सव योजनेचे घटक, याबाबत सविस्तर माहिती दिली.
कृषिमंत्र्यांनी घेतला सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील विकास कामाचा आढावा
फर्दापूर येथील शिवस्मारकाकरिता अंदाजपत्र दिले असून 50 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. संबंधितांनी लवकरात लवकर डीपीआर देण्याच्या सूचना श्री.सत्तार यांनी दिल्या. तसेच भीमपार्क करीता सामाजिक न्याय विभागाकडून 15 कोटी निधीला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. लवकरात लवकर सल्लागार नेमून डीपीआर सादर करावा. फर्दापूर येथील वीज, पाणी, आदी मूलभुत सोईबरोबरच नाट्यगृह, उपजिल्हा रुग्णालय, मका संशोधन केंद्र, फर्दापूर येथील आरोग्य केंद्र, क्रिडा संकुल, मुलांचे शासकीय वसतीगृह, पोलीस निवासस्थान सिल्लोड तालुका दुध संघ, कृषिभवन, स्मशानभूमी, नाट्यगृह, सिल्लोड येथील एमआयडीसी, आदींचा सविस्तर आढावा यावेळी श्री.सत्तार यांनी घेतला.
*****