Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अमृत महोत्सवी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती द्यावी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 5 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व नियोजित कामांना गती देऊन दर्जा व वेळ यांस प्राधान्य द्यावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या बैठकीत, ग्रामविकासाला गती प्राप्त करुन देणारी प्रबोधिनी नागपूरला उभारण्याचा व यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कोअर समितीची बैठक सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे झाली. या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे,शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभाग आणि इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अमृत महोत्सवी वर्षात राज्यातील विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम व उपक्रमांचा आढावा घेत असताना “यशदा” च्या माध्यमातून पुणे जवळील ताथवडे परिसरात अद्ययावत सुसज्ज सभागृह, प्रशिक्षणासाठी छोटी सभागृहे एका वर्षात पूर्ण करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथे एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र निर्माण करुन अमृत महोत्सवी वर्षात महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी 43 विविध कौशल्य प्रशिक्षणासाठी प्राधान्य दिले जाईल. यासाठी 55 कोटीच्या निधीस मान्यता प्रदान करण्यात आली. या विद्यापीठ परिसरात महिला क्रांतीकारकाच्या आठवणी जागृत व्हाव्या, प्रेरक माहिती, चित्रकृती त्या भागात असावी, असे निर्देश देण्यात आले.
दिव्यांगांसाठी नुकताच स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना दिव्यांगासाठी विशेष आणि नावीन्यपूर्ण योजना आखली जावी.
ग्रामविकास विभागामार्फत महाराष्ट्र ग्रामविकास व संशोधन प्रबोधिनी ‘महारुद्र’ हे अमृत महोत्सव वर्षानिमित्त उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही प्रबोधिनी नागपूर येथे उभारली जाईल. यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थावर काम करणाऱ्या सदस्य, कर्मचारी यांच्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन या संस्थेतून होईल. येत्या काही दिवसात या विषयासाठी स्वतंत्र बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित राहतील, असे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यात येत्या काळात विविध विभागामार्फत सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे. या उपक्रमांबाबत बैठकीत सादरीकरण करण्यात आले. हा उपक्रम राबविण्यासाठी येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या करण्यात येतील.
यावेळी सामान्य प्रशासन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शालेय शिक्षण, पर्यटन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, नियोजन, सामाजिक न्याय विभागाने सादरीकरण केले.
‘एक भारत, श्रेष्ठ भारत‘ संकल्पनेनुसार राज्यात बंगाली, तेलगू अकादमीचा समावेश करणार
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यापूर्वी हिंदी, गुजराती आणि सिंधी अकादमी स्थापन करण्यात आल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यात बंगाली आणि तेलगू अकादमी लवकरच स्थापन करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आज महाराष्ट्रात मराठीसह विविध भाषा बोलल्या जातात. मराठी बरोबर हिंदी, गुजराती, सिंधी, तेलगू आणि बंगाली लोक येथे राहतात. एक भारत , श्रेष्ठ भारत या संकल्पनेनुसार येणाऱ्या काळात तेलगू आणि बंगाली अकादमी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्थापन करण्यात येईल.
००००
वर्षा आंधळे/विसंअ/