Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत कुरघोडी राजकारणात पंकजा मुंडे यांचे राजकीय वजन कमी करण्यासाठी वंजारी समाजाचा चेहरा असणारे भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन आपली पहिली खेळी खेळली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे बोलले जात असताना खासदार डॉक्टर भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
आता याच भागवत कराड यांच्यावर तीस वर्षापासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, परभणी लोकसभा मतदारसंघातील गंगाखेड, जिंतूर पाथरी घनसावंगी परतुर आणि परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये पंकजा मुंडे यांचा थेट प्रभाव आहे. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भाजपामध्ये गटातटाचे राजकारण आहे. भाजपाच्या एका बैठकीमध्ये दोन जिल्हाध्यक्ष एकमेकांच्या अंगावर मारण्यासाठी गेल्याचे देखील या अगोदर परभणी जिल्ह्याने पाहिले आहे.
असे असताना देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड पक्षात अंतर्गत असलेली गटबाजी संपवून पंकजा मुंडे यांचा परभणी लोकसभा मतदारसंघावर थेट प्रभाव असताना आणि परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मागील ३० वर्षापासून असल्यामुळे या ठिकाणी आपली जादू कशी चालवणार असाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
या मतदारसंघावर सर्वाधिक प्रभाव
माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा परभणी विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड, जिंतूर, पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक प्रभाव आहे. विशेष बाब म्हणजे जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकर या पंकजा मुंडे यांनी प्रचाराच्या शेवटच्या वेळी घेतलेल्या सभेमुळे निवडून आल्या होत्या. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात देखील पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, याच ठिकाणी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडवणीस असे दोन गट आहेत. त्यामुळे भागवत कराड यांच्यासमोर मोठा अडचणीचा डोंगर आहे. तेव्हा भागवतराव कराड परभणीतून भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचे शिवधनुष्य कसे पेलणार, हे आगामी काळात पाहावे लागेल.