Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे महापालिकेचे विभाजन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक निर्णय, उरळी-फुरसुंगीची नगरपालिका

14

म. टा. प्रतिनिधी, पुणे : भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या पुणे महापालिकेतून उरळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्याचा धक्कादायक निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आदेश मुख्यमंत्री, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या संदर्भातील आदेश पुढील १५ दिवसांत काढण्यात येणार आहेत.

पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या उरळी आणि फुरसुंगी या दोन गावांसह आणखी नऊ अशा ११ गावांचा समावेश ऑक्टोबर २०१७ मध्ये महापालिकेत करण्यात आला होता. पालिकेतील समावेशानंतर येथे गेल्या पाच वर्षांत विविध विकासकामांना गती देण्यात आली होती. पालिकेच्या नियमांनुसार येथून मिळकतकर वसूल करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, पालिकेतर्फे पुरेशा सुविधा दिल्या जात नसताना मोठ्या प्रमाणात कर घेतला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. त्याबाबत वारंवार बैठका घेतल्या जात असूनही मिळकतकरात सवलत दिली जात नव्हती. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर मिळकतकर कमी करण्याची मागणीही लावून धरली होती. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांनी मंगळवारी मुंबईत घेतलेल्या बैठकीत दोन्ही गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिकेचे उपायुक्त अजित देशमुख उपस्थित होते. या दोन्ही गावांमधील नागरिकही या वेळी उपस्थित होते.

नगरपालिकेच्या माध्यमातून उरळी देवाची, फुरसुंगीमधील नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल; तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकासकामांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरेल.

– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत उरळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे पुणे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय झाला. या दोन्ही गावांची नगरपालिका होणार आहे. या गावांची लोकसंख्या दीड ते दोन लाखांच्या आसपास आहे. ही गावे पालिकेतून वगळण्यात आल्याने येथे आता कोणताही खर्च महापालिकेला करता येणार नाही.

– विक्रमकुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उरळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याचा अध्यादेश निघेल. मिळकतकराचे अवजड ओझे आणि निधीची कमतरता यामुळे गावकरी त्रस्त झाले होते. नगरपालिकेचा निर्णय झाल्याने एका नगरसेवकाच्या जागी ४० नगरसेवक येतील. लोकांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळून गावांचा विकास होईल.

– विजय शिवतारे, माजी मंत्री

Pune : पुणेकरांसाठी गुड न्यूज!; भुयारी मार्गावर ‘मेट्रो’चे पहिले पाऊल, नवीन वर्षात मिळणार भेट
दोन्ही गावांची अंदाजे लोकसंख्या – १.५ ते २ लाख

दोन्ही गावांचे एकत्रित क्षेत्रफळ – २८.२५ चौ. किमी.

पालिकेने गावांत गेल्या पाच वर्षांत केलेला खर्च – २२५ कोटी रु.

संथ वाऱ्यांमुळे राज्यात प्रदूषण पातळीत वाढ, राज्यातील अनेक शहरांच्या हवेची गुणवत्ता घसरली

मटा भूमिका

राज्यातील सर्वांत मोठी महापालिका ठरलेल्या पुणे महापालिकेचे विभाजन करून, स्वतंत्र महापालिका करावी, अशी मागणी सातत्याने केली जात असताना राज्य सरकारने सध्याच्या महापालिकेतील केवळ दोन गावे वेगळी काढून त्यांची नगरपालिका करण्याचा निर्णय अचानक घेतला. पाच वर्षे महापालिकेतर्फे पुरवल्या जाणाऱ्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेतल्यानंतर आणि तेथे विविध विकासकामांना गती मिळत असताना केवळ काही दुराग्रही नेते आणि त्यांची दिशाभूल करणाऱ्या ग्रामस्थांच्या अनाठायी हट्टापायी या दोन गावांच्या नगरपालिकेचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला. या दोन्ही गावांमधून रिंग रोड जाणार आहे; तेथे नगररचना योजना प्रस्तावित आहेत; पण भविष्यातील विकासासाठी दूरदृष्टीने निर्णय घ्यावे लागतात. त्याऐवजी अल्पहित नजरेसमोर ठेवून कोणतेही तर्कशास्त्र न लावता घाईघाईने घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फायद्यापेक्षा तोटाच अधिक होण्याची शक्यता आहे. नव्या महापालिकेसाठी संपूर्ण पूर्व भागाचा विचार करण्याऐवजी केवळ दोन गावांसाठी झालेली ही नगरपालिका ग्रामस्थांसाठी ओझे ठरू नये, हीच अपेक्षा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.