Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

VIDEO : डोक्यात शेण भरलंय त्यांच्या अन्….; अमोल कोल्हेंनी धारदार कवितेतून चंद्रकांत पाटलांना झोडपलं

18

पुणे : भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद सुरू झाला आहे. ‘महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या तेव्हा सरकारने त्यांना अनुदान दिले नव्हते; त्यांनी लोकांकडे भीक मागितली,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. पाटील यांच्या या वक्तव्यावरून चहुबाजूने टीका होत असताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी एका कवितेच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करत राजकीय नेत्यांचे भान सुटलं आहे. मात्र जनतेला अजूनही भान असल्याचे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

चंद्रकांतदादांचं वादग्रस्त वक्तव्य, प्रकाश आंबेडकरांनी खोक्यांच्या भाषेतच सुनावलं!

काय आहे अमोल कोल्हे यांची कविता?

“जागलेली माणसं, वाचलेली पुस्तकं
रुजलेले विचार सारे कुतूहलाने गोळा झाले
हे नवीन पुतळे, ते नवीन बॅनर
एवढ्या अचानक कुठून आले?
पुतळ्यांच्या गळ्यात चपलांचे हार
प्रत्येक बॅनरला जोड्यांचा प्रसाद
रुजल्या विचारांनी आस्थेनं विचारलं
काय झालं?
पुन्हा कोणी समाज सुधारण्यासाठी
काम सुरू केलं?
प्रश्नासरशी
बॅनर्सने लाजेने अंग गुंडाळून घेतलं
पुतळ्यांनी तर शरमेनं तोंड लपवली
तरीही एका जागल्या माणसानं
त्यांची ओळख पटवली..
बॅनरवरील चेहरा पाहिला होता
भला मोठा हार घालताना
आवाजसुद्धा ऐकला होता
जोशपूर्ण भाषण ठोकताना..
अरेच्चा! हे तर तेच महोदय….
हे तर ते, ते तर हे म्हणता म्हणता
सगळ्या चेहऱ्यांची ओळख पटली..
निषेध उद्वेग संताप
सारं काही उमटलं होतं
प्रत्यक्षात जमत नाही म्हणून
बॅनर पुतळ्यांना कुटलं होतं
कळवळून शेवटी एक पुतळा बोलला
जोडे खाऊन खाऊन आम्हालाच कंटाळा आला…
डोक्यात शेण भरलंय त्यांच्या
अन् भोग मात्र आमच्या वाट्याला..
महापुरुषांच्या नखाचीही सर नसताना
का जावं अकलेचे तारे तोडायला

समाधानाने पुस्तकं फडफडली
चला, आमच्या शब्दांमध्ये अजून जान आहे
राज्यकर्त्यांचे भान सुटलं
तरी जनतेला मात्र जाण आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि महापुरुषांबाबत होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांवरून कोल्हे यांनी भाजप नेत्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.