Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नाग नदीचे पुनरुज्जीवन
४१ किलोमीटर लांबी असलेल्या नाग नदी, पिवळी नदी आणि बोर नाला यांच्या स्वच्छतेसाठी सुमारे १,९२७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली आहे. पंतप्रधान त्याची घोषणा करतील. या नदीसाठी ‘मटा’ने जागर केला होता.
मेट्रो लोकार्पण आणि घोषणा
मेट्रोच्या कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक आणि सीताबर्डी ते प्रजापतीनगर या दोन मार्गांवर मेट्रो धावणार आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणाही ते करतील. यासाठी ६,७०८ कोटींचा खर्च होणार आहे.
समृद्धी महामार्ग
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणारा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. मुंबईपर्यंतचा मार्ग एक मेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या महामार्गामुळे मुंबई व नागपूर ही शहरे जवळ येतील. उद्योगधंदे वाढून शेतकऱ्यांनाही दळणवळणास मदत होईल.
‘एम्स’चे लोकार्पण
जुलै २०१७ पंतप्रधानांनीच ज्या ‘एम्स’ची पायाभरणी केली होती, त्याचे लोकार्पणही केले जाणार आहे. अत्याधुनिक सुविधा असलेले ३८ विभाग तिथे आहेत. पंतप्रधान तिथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेस
नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. नागपूर व अजनी या रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची पायाभरणी करतील. या दोन स्थानकांच्या कामासाठी अनुक्रमे ५९० आणि ३६० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
‘वन हेल्थ’ राष्ट्रीय संस्था
नागपूरमधील एनआयओ अर्थात, वन हेल्थ राष्ट्रीय संस्था उभारणीची पायाभरणी होणार आहे. ११० कोटी रुपये खर्चून ही संस्था उभारली जात आहे.
सीआयपीईटी
चंद्रपूर येथील केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (सीआयपीईटी) आणि हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र देशाला समर्पित करतील. पॉलिमर आणि संबंधित उद्योगांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कुशल मनुष्यबळ विकसित करणे हा या संस्थेच्या उभारणीमागील उद्देश आहे.
दौरा असा…
९.१५ वाजता : नागपूर विमानतळावर आगमन
९.३० वाजता : वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी
९.४५ वाजता : फ्रिडम पार्क-मेट्रो प्रदर्शनाला भेट
१० वाजता : झिरो माइल ते खापरी मेट्रोने प्रवास
१०.१५ वाजता : खापरीत मेट्रोचे लोकार्पण, शिलान्यास
१०.५५ वाजता : समृद्धीचे लोकार्पण व त्यावरून दहा किमी प्रवास
११.२५ वाजता : एम्स येथे सभा, प्रकल्पांची घोषणा
०१.०५ वाजता : गोव्यासाठी रवाना