Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘लोकार्पण सोहळ्याच्या वेळी म्हणे पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्याजवळ खेचले व पाठीवर थाप मारली व त्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्यासमोर ओशाळवाण्या चेहऱ्याने हात जोडून उभे राहिल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले. मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारली म्हणजे जी काही शाब्बासकी दिली ती कशासाठी? तर ‘‘शाब्बास! जे काम औरंगजेब, अफझल खानास जमले नाही, ते शिवसेना फोडण्याचे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही केलेत. शाब्बास रे माझ्या गब्रू!’’ शाब्बासकी असेल ती यासाठीच,’ असा संताप शिवसेनेने व्यक्त केला आहे.
वाचाः पोलिस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना अर्ज करण्याचा मार्ग खुला; वेबसाइटमध्ये महत्त्वाचा बदल
सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे
- पंतप्रधान मोदी यांनी देशाची लूट करणाऱ्यांवर व भ्रष्ट मार्गाने राज्य करणाऱ्यांवर एका तळमळीने आसूड ओढले, पण हे शब्दांचे आसूड ओढताना त्यांनी आपल्या डाव्या-उजव्या बाजूला कटाक्ष फेकला असता तर देशाची लूट करणारे, भ्रष्ट मार्गाने राज्य करणारे कोण हे लक्षात आले असते. पंतप्रधानांच्या व्यासपीठावरच एक घटनाबाह्य सरकार बसले होते व ‘खोके’ सरकार म्हणून ते बदनाम आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी कितीही तळमळीने भावना व्यक्त केल्या तरी ते एकटे कोठे पुरे पडणार?
- अनेकदा मनात नसतानाही घटनाबाह्य सरकारच्या पाठीवर थाप मारावी लागते. महाराष्ट्रात विकासातील ११ तारे उदयाला येत आहेत. यातील पहिला तारा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मोदी यांनी महाराष्ट्र विकासाच्या 11 ताऱ्यांची ‘गिनती’ केली, पण गेल्या दोन-चार महिन्यांत महाराष्ट्रातून अनेक औद्योगिक प्रकल्प ओरबाडून गुजरातेत नेल्याने विकासाची गंगा थांबली व लाखो तरुणांचा रोजगार गेला. महाराष्ट्राच्या तिजोरीचे नुकसान झाले.
- महाराष्ट्र हा कृषी व औद्योगिक क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाचा तारा होता. तो तारा गेल्या काही महिन्यांत निस्तेज करण्याचे प्रयत्न कोणी केले याचे उत्तर पंतप्रधानांनी नागपुरातच द्यायला हवे होते. नागपूरच्या मिहानमधूनच प्रकल्प गुजरातेत गेले हे काय उपमुख्यमंत्री फडणवीस यांना माहीत नाही? महाराष्ट्राचे नाक कापून पुन्हा ११ ताऱ्यांची भाषा करणे हे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
वाचाः ‘जी-२० उत्सवा’साठी ‘डिजिटल भारत’ सज्ज; महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार
- समृद्धी महामार्गास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले. त्यामुळे म्हणे आपले मुख्यमंत्री महोदयांचे डोळे पाणावले! हे ढोंगच आहे. लोकार्पणाचा कार्यक्रम जेथे पार पडला त्या कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चार मोठे कटआऊट सरकारतर्फे लावण्यात आले होते. त्यात हिंदुहृदयसम्राटांचे कटआऊट सगळ्यात शेवटी म्हणजे चौथ्या क्रमांकावर होते. ज्यांच्या नावाने हा महामार्ग त्यांचे स्थान सगळ्यात शेवटी व आपले मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या नावाने डोळे पुसत होते! सगळ्यात आधी मोदी, त्यामागे श्री. फडणवीस मग मुख्यमंत्री व शेवटी बाळासाहेब ठाकरे हा क्रम कोणी लावला?
- ज्यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्याच सडक्या डोक्याचे हे कारस्थान आहे. महाराष्ट्राचा मुख्य तारा अशाप्रकारे अपमानित करून इतर अकरा ताऱ्यांचे गुणगान कसे करता, मग ते हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय असोत, नाही तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्रात येऊन आमच्या दैवतांचा अपमान करण्याचा जणू अफझलखानी विडाच या मंडळींनी उचलला आहे.
वाचाः पंतप्रधानांच्या हत्येची तयारी ठेवा, नेत्याचे मोदींविषयी ‘जीवघेणे’ वक्तव्य; गुन्हा दाखल