Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एक ते पाच जानेवारी दरम्यान सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सव – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

5

महोत्सवात कृषी विद्यापीठे, विविध शासकीय विभागांसह विविध यंत्रणांचे ६०० स्टॉल्स

 मुंबई, दि. 15 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना 50 वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठांनी आतापर्यंत केलेली वाटचाल व त्यांची संशोधने ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत दि. 01 जानेवारी ते 5 जानेवारी, 2023 या कालावधीत सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव – 2023 चे आयोजन केले आहे. राज्यातील कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन, नवीन वाणांची निर्मिती याबरोबरच नाविन्यपूर्ण कृषी संशोधन, शेतकऱ्यांशी थेट संवाद, विविध चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके आणि विविध योजनांची शेतकऱ्यांना थेट माहिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

कृषि विभागाच्यावतीने दरवर्षी जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याबाबतची माहिती देण्यासाठी मंत्री श्री.सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी (अहमदनगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जि. रत्नागिरी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) या चार विद्यापीठांनी केलेली संशोधने, कृषी विभागाची प्रात्यक्षिके, परिसंवाद, तंत्रज्ञान, राज्यातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, असे एकत्रित सादरीकरण करणारा हा पहिलाच राज्यस्तरीय कृषी महोत्सव आहे. यामध्ये राज्यभरातील विविध प्रयोग ज्यामध्ये उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक किटक व्यवस्थापन, एकात्मिक शेती व्यवस्थापन, सेंद्रिय आणि रासायनिक शेतीची प्रात्यक्षिके विद्यापीठांकडून सादर केली जाणार आहेत. राज्यभरातून शेतकरी या महोत्सव आणि प्रदर्शनास भेट देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आगामी 2023 हे वर्ष ‘भरड धान्यांचं’ म्हणून साजरे केले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्राची भूमिका, महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे कार्यक्रम यावरही महोत्सवातील चर्चासत्रांमधून विचारमंथन होणार आहे. महोत्सवात कृषि विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चासत्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील, असे मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट, त्यासंबंधी होणारे संशोधन, नवीन वाणांचे संशोधन, बदलेले वातावरण पर्जन्य आणि उष्णता यांच्या बदलांचा वेध घेऊन करण्यात येत असलेलं संशोधन याचेही सादरीकरण यावेळी महोत्सवात करण्यात येणार आहे.

या महोत्सवात कृषि विभाग, कृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग याबरोबरच कृषि तंत्रज्ञानात सहभाग असणारे विविध खासगी दालने असणार आहेत. कृषी विभागाच्या एकात्मिक दालनामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, पोकरा, स्मार्ट, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फळप्रक्रिया यांचे सादरीकरण केले जाणार आहे. बाजारपेठांचे नवीन तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान याची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा योजनांची माहिती देणारी दालने देखील महोत्सवात असतील. कृषी निविष्ठा, तंत्रज्ञान, सिंचन साधने यांचीही माहिती देणारी 160 पेक्षा अधिक दालने महोत्सवात असतील. शिवाय शेतीविषयक अवजारे, मशिनरी, नवनवीन यांत्रिकीकरण, ऑटोमेटेड फार्मिंग, यांचीही दालने असतील. शेतीपूरक लघुउद्योगांसाठी विशेष दालन, यामध्ये राज्यभरातील विविध शेतकरी गटांनी तयार केलेली उत्पादनेही शेतकऱ्यांना पहावयास मिळतील, असे मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

या महोत्सवात एकूण सहाशे दालने असणार आहेत. तसेच सायंकाळी शेतकऱ्यांसाठी आणि महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध प्रबोधानात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवास भेट देऊन येथील चर्चासत्रे, प्रदर्शन, प्रात्यक्षिके याचा लाभ घ्यावा, यासाठी कृषि विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. सत्तार यांनी दिली.

या राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सवाचे यशस्वी आयोजन व्हावे, यासाठी कृषि विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांची राज्यस्तरीय नियंत्रक अधिकारी तर कृषि सहसंचालक तुकाराम मोटे यांची समन्वयक अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

0000

दीपक चव्हाण/विसंअ

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.