Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदलासाठी प्रयत्न करावा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 16 : मुंबई शहर जिल्ह्यात ‘माझी मुंबई – स्वच्छ मुंबई’ अभियान राबविले जात आहे. सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अभियानाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
मुंबईचा शाश्वत विकास करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून या अभियानामध्ये शाळांचा सक्रीय सहभाग असावा या उद्देशाने श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीवकुमार, पी.वेलारासू, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, महानगरपालिकेच्या उपायुक्त चंदा जाधव, अभियानाचे मुख्य समन्वय अधिकारी डॉ.सुभाष दळवी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळांचे सुमारे 1000 मुख्याध्यापक ऑनलाईन उपस्थित होते.
अभियान कालावधीत प्रत्येक आठवड्यातील शनिवार व रविवार स्वच्छता दिवस म्हणून घोषित करण्यात येतील. या दिवशी अभियान भागीदार त्यांच्याशी निगडीत अथवा त्यांनी निवडलेल्या क्षेत्रामध्ये स्वच्छता अभियान राबवतील. अभियान कालावधीत उर्वरित दिवशी स्वच्छता विषयक विविध कार्यक्रम हाती घेण्यात येतील. तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे आयोजन व मिशन मोडमध्ये स्वच्छताविषयक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प राबविणे अशा कार्यक्रमांचा अंतर्भाव करण्यात येईल, असे बैठकीत नियोजन करण्यात आले.
सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, महानगरपालिकेच्या शाळा, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक/ माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृतीद्वारे सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल घडवून अभियानाची अंमलबजावणी करतील. हे अभियान यशस्वी होण्याकरीता आपल्या शाळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला जाईल तसेच महानगरपालिकांचे प्रभाग कार्यालय व शिक्षण विभागाची कार्यालये यांच्याकडून आवश्यक ते साहाय्य करण्यात येईल, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
०००