Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रत्नागिरी दि.१६:- रत्नागिरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार भरत गोगावले, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, संचालक तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई डॉ. अभय वाघ, तसेच लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करून भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ झाला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज रत्नागिरी जिल्ह्यात ८०० कोटीहून अधिक विकास कामांचे शुभारंभ झाले. परंतु त्यात सर्वात महत्त्वाचा शुभारंभ सोहळा हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा झाला आहे. रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जावे लागत होते, परंतु ही अडचण आता दूर झाली आहे. तरुण पिढीला चांगल्या उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे ही शासनाची मुख्य भूमिका आहे. तरुणांना शिक्षणाचा भविष्यात योग्य उपयोग होऊन प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. रोजगाराच्या दृष्टीने आवश्यक ते करार व निर्णय शासनामार्फत घेण्यात येत आहेत. थांबलेल्या भरती प्रक्रिया सुरू करून ७५ हजार नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. हे शासन औद्योगीकरणाला प्रोत्साहन देत आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांचे आभार मानले. कारण त्यामुळेच तरुण पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
हे शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, माता-भगिनींचे, सामान्य जनतेचे सरकार आहे. समाजातील सर्व घटकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. राज्यातील सर्व घटक सुखी समाधानी झाले पाहिजे हीच या शासनाची मुख्य भूमिका आहे.
उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. त्यामुळे या संकुलाबद्दल माझ्या मनात विशेष भावना आहे. मी मागील काळात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होतो. त्या वेळेला विविध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता उद्योग मंत्री आहे आणि हे संकुल परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. विविध मोठ्या उद्योगांच्या बरोबर येथे कौशल्य विकासाचे विविध प्रयोग केले जाणार आहे. येथील स्थानिक विद्यार्थ्यांना बाहेर जाऊ लागू नये यासाठी तंत्रशिक्षणाच्या विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करीत आहोत. आणि आज या इमारतीच्या रूपाने बरीचशी स्वप्नं पूर्ण होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल मी आभार मानतो.
यावेळी राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन नियोजित इमारतीची वैशिष्ट्ये
शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी इमारत बांधकामासाठी रु. ४६ कोटी २१ लाख २१ हजार ३२७ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. इमारत तळ मजला अधिक २ मजले अशी आर.सी.सी. बांधकामाची असून मेकॅट्रॉनिक्स इंजिनियरींग, सिव्हील व इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स, इलेक्टिकल इंजिनियरींग, फूड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट अशा अभियांत्रिकीच्या ५ शाखांकरिता एकूण ३०० विद्यार्थ्यांकरिता ३० वर्गखोल्या शाखांना आवश्यक ३४ प्रयोगशाळा व कार्यशाळा, ग्रंथालय व अभ्यासिका, प्रत्येक मजल्यावर पुरेशी स्त्री व पुरुष प्रसाधनगृहे, उद्वाहने, उपहारगृह व त्याचे स्वयंपाकगृह, विभागप्रमुखांचे कक्ष, प्राचार्य कक्ष, कॅम्पस मुलाखतीकरिता स्वतंत्र कक्ष, समिती कक्ष अशा महत्त्वाच्या वाबींचा समावेश आहे.
000