Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विश्वशांतीचे केंद्र म्हणून नांदेडला विकसित करण्यावर भर देऊ  – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

4

– होट्टल महोत्सवासाठी भरीव तरतूद

– लोकाभिमुखतेसाठी जिल्ह्यात पर्यटन समिती

वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. २५ :- अध्यात्म, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन याचा सुरेख संगम नांदेड जिल्ह्यात आहे. संपूर्ण विश्वाला आवश्यक असलेल्या शांतीचे प्रतिक म्हणून नांदेडच्या पवित्र भूमीकडे पाहिले जाते. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराच्या माध्यमातून जो शांती व एकात्मतेचा संदेश दिला जातो तो अत्यंत मोलाचा आहे. येथील हे शक्तीस्थळ भक्तीसह विश्वशांतीचे केंद्र म्हणून विकसित करण्यावर आपण सर्व मिळून भर देऊ, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन,  कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

महाराष्ट्र शासन, पर्यटन विभाग, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वारा यांच्या संयुक्त विद्यमाने वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन आज गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे त्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास पंजाबचे विधानसभेचे सभापती स. कुलतार सिंघ संधवान, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहनराव हंबर्डे,  खासदार स. विक्रमजित सिंघ साहनी, उपसभापती जयकिसन सिंघ, आमदार कुलवंत सिंघ, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, माजी पोलीस महासंचालक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. जी. माळवदे, दै. तरुण भारत वृत्तपत्राचे संपादक किरण शेलार, प्रविण साले, लड्डू सिंग महाजन आदींची उपस्थिती होती.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, अखंड हिंदुस्थान हीच आपली ओळख आहे. आपल्या इतिहासात जर डोकावून पाहिले तर आपल्या अखंडत्वाला वेळोवेळी तोडण्याचा इतिहास आपल्या लक्षात येईल. इथे राहणाऱ्या सर्व धर्मांनी एकात्मता ठेऊन राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. आपली एकात्मता यातूनच देशाची अखंडता टिकून राहिली आहे. ही अखंडता टिकवून ठेवण्यासाठी शीख धर्माने याचबरोबर  साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा फतेहसिंघजी यांचे बलिदान देश कधी विसरणार नाही. देशाच्या अखंडतेसाठी ज्यांनी बलिदान दिले आहे तो इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचावा या उद्देश ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीरबाल दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एक बुलंद संदेश नांदेड येथून देण्यास प्रारंभ करतांना आम्हाला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री गुरूगोविंदसिंघजी यांची ही पावन भूमी आहे. श्री गुरूगोविंदसिंघजी यांनी सदैव एकात्मतेवर भर दिला. त्यांनी सहिष्णुतेवर भर दिला. त्यांनी दिलेल्या या गुरूसंदेशाला विचारात घेऊन नांदेड हे विश्वशांतीचे केंद्र म्हणून विकसित करण्यामध्ये पर्यटन विभागाने अधिक निधी द्यावा, अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

यावेळी सेवानिवृत्त व्हाइस चान्सलर पंजाबी युनिर्व्हसिटी पटीयालाचे डॉ. स. जसपाल सिंघजी, पंजाब कला परिषदेचे अध्यक्ष स. सुरजीत सिंघजी पातर, पंजाबी साहित्य अकॅडमीचे सेवानिवृत्त अध्यक्ष राजन खन्ना यांनी साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा फतेसिंघजी यांच्या साहसाबद्दल माहिती दिली. श्री गुरूगोविंदसिंघजी यांनी धर्माचा अर्थ सत्य असल्याचे सांगितले आहे. सत्याचे पालन यातच संपूर्ण जगाच्या कल्याणाचा मार्ग असून भारताचा राष्ट्रवाद हा संताचा असल्याचे प्रतिपादन राजन खन्ना यांनी केले.

ज्या इतिहासावर आपण उभे आहोत तो इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहचवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. श्री गुरूगोविंदसिंघजी धर्मानुसार चालले म्हणून आपली अखंडता टिकून राहिल्याचे प्रतिपादन पंजाब विधानसभेचे सभापती कुलतारसिंघ संधवान यांनी केले. साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा फतेसिंघजी हे येणाऱ्या पिढीचे आयकॉन असल्याचे तरुण भारत वृत्तपत्राचे संपादक किरण शेलार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे बाल वीर दिवसानिमित्त दोन दिवस संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगुन प्रास्ताविक माजी पोलीस महासंचालक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा यांनी केले.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळ व कौशल्य विकास विभागाबाबत पर्यटनमंत्री लोढा यांनी घेतली आढावा बैठक

नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्र यांचे महत्त्व लक्षात घेता यावर येत्या काळात अधिक भर दिला जाईल. रोजगार व स्वयंरोजागाराच्या संधी संबंधित पर्यटन तीर्थक्षेत्राच्या भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात, यादृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. पर्यटनक्षेत्राच्या विकास कामात लोकसहभागही तेवढाच महत्वाचा असतो. पर्यटनक्षेत्राच्या संदर्भात असणाऱ्या ज्या सेवासुविधा लागतात त्यात कार्य करणारे हॉटेल, गाईडस्, पर्यटनाशी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था यांचा सहभाग तेवढाच आवश्यक असतो. हे लक्षात घेता जिल्हा  पातळीवर पर्यटनाच्या विकासासंदर्भात अशासकीय सदस्यांची एक समिती नियुक्त करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) रेखा काळम, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार उपस्थित होते.

जिल्ह्यातील एकुण पर्यटनक्षेत्रापैकी प्राथमिक स्तरावर क दर्जाच्या 15 पर्यटनक्षेत्रावर प्राथमिक पायाभूत सुविधा विकसीत केल्या जातील, असे पर्यटन मंत्री लोढा यांनी जाहीर केले. होट्टल महोत्सवासाठी भरीव तरतूद करून या ठिकाणी जनसुविधेच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हा महोत्सव एप्रिल ऐवजी फेब्रुवारी महिन्यात घ्यावा या सूचनेचा त्यांनी स्विकार करून पर्यटन विभागाला निर्देश दिले. याचबरोबर जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र यांना जोडणारे एक सर्किट निर्माण करून विकासावर भर देऊ असेही त्यांनी सांगितले. शंभर किमी परिसरातील जेवढी पर्यटनस्थळे येतील, तीर्थक्षेत्र येतील त्याचा यात समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात पाच लाख बेरोजगारांना देऊ रोजगार

ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी ग्रामीण पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने आम्ही भर देत आहोत. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना आयटीआय केंद्राच्या मार्फत वेगळे कोर्सेस तयार करीत आहोत. यात प्रामुख्याने सौरऊर्जा, कृषिक्षेत्र याबाबींचा विचार आम्ही केला आहे. राज्यात सुमारे पाच लाख युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

वीर बालकांच्या शहिदांची आठवण करतांना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गाऊन व्यक्त केल्या भावना

साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा बाबा फतेह सिंघजी यांच्या वीर बलिदानाचे स्मरण करतांना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना आपल्या भावना व्यक्त करतांना “कही पर्वत झुके भी है” हे गीत गाऊन दाखविले.

000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.