Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
साक्षीचे स्वप्न साकार! मुंबईतील दाम्पत्याने घेतले १५ वर्षीय मुलीला दत्तक, असेही एक ‘समंजस’ दत्तक विधान
या निर्णयामुळे या दाम्पत्याचे आणि दत्तक मुलीचे आयुष्य बदलून गेले आहे. लहान बाळाला वाढवण्याची असोशी कित्येक पालकांना असते; पण कळत्या वयातल्या या मुलांनाही हक्काचे घर हवे असते. ते त्यांना योग्य वयात मिळाले, तर त्यांच्या आयुष्याला दिशा मिळू शकते. एका मुलाला कुटुंब अन् कुटुंबाला मायेचे माणूस लाभते ही जाणीव खूप मोलाची असते. हे सांगायला नमिताताई व त्यांची मुलगी साक्षी विसरत नाही.
कळत्या वयातील मोठ्या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय इतरांपेक्षा खूप वेगळा असून, हा निर्णय घेण्यामागे या दाम्पत्याचा कोणता विचार होता या संदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी हा समंजस निर्णय असल्याचे सांगितले. ॲड. नमिता आणि विक्रांत यांची अनेक वर्षांपासून मुलगी दत्तक घेण्याची इच्छा होती. काही ना काही कारणांमुळे हा निर्णय लांबणीवर पडला. पन्नाशीच्या टप्प्यावर असताना, लहान बाळ दत्तक घेण्यापेक्षा कळत्या वयातील मुलीला दत्तक घेण्याचा विचार त्यांनी पक्का केला. हा निर्णय घेण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यात प्रश्न होते. करोनासारख्या संसर्गाचे सावट होते. मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान विचारले जाणारे अवघड प्रश्न, त्याची निर्णय कसाला लावणारी उत्तरे… हा सारा टप्पा पार करून त्यांनी साक्षीला आणि साक्षीने त्यांना पालक म्हणून स्वीकारले.
संस्थेमध्ये राहिलेली साक्षी मागील काही वर्षांपासून इतर लहान बाळांप्रमाणे आपल्यालाही हक्काचे आईबाबा मिळतील याची वाट पाहत होती. यंदा तिचे दहावीचे वर्ष आहे. साक्षी म्हणाली, ‘मला खूप पैसे, सुखसुविधांनी संपन्न असलेल्या घरापेक्षा मायेची ओढ होती. हक्काची माणसे हवी होती. माझे आईबाबा उच्चशिक्षित आहेत. अभ्यास करायला पूर्वी कंटाळा यायचा. शाळेत जात होते. पुढे काय करायचे हे माहीत नव्हते. आता दिशा सापडली आहे. अभ्यासाचे महत्त्व पटले आहे.’ कुटुंबाची ओढ होती. हे स्वप्न साकार झाल्यामुळे आता आयुष्याला अर्थ आल्याचे ती आवर्जून सांगते.
वाढत्या वयासोबत मुलाला मूल होऊन सांभाळण्याची क्षमता कमी होते. दहा वर्षांपुढील मुलांचा व त्यांना दत्तक घेणाऱ्या पालकांना परस्परांना आहे तसे स्वीकारण्याचा कल अधिक असतो. भाषा, आहाराच्या पद्धती, इतर सवयी अशा अनेक पातळ्यांवर स्वतःमध्ये बदल करावे लागतात. मुलाच्या कलाने घ्यावे लागते. ही संपूर्ण प्रक्रिया आनंददायीही असते हेदेखील नमिता यांनी सांगितले.
गुड न्यूज! नवीन वर्षात मुंबई, ठाणे ते नाशिकपर्यंत करा सुखाचा प्रवास; हे मोठे प्रकल्प होणार पूर्ण
‘पुढाकार घ्यायला हवा’
दत्तक विधान प्रक्रियेतील सक्रिय कार्यकर्ते व बाल आशा संस्थेचे प्रमुख सुनील अरोरा यांनी नमिता-विक्रांत यांनी घेतलेला हा निर्णय़ अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्यापासून प्रेरणा घेऊन इतर पालकांनीही पुढे यायला हवे. लहान मुलांप्रमाणे मोठ्या मुलांचे दत्तक विधान व्हायला हवे, असा आग्रह व्यक्त करतात.
उत्साही जल्लोषात नववर्षाचे स्वागत; मुंबईत किनारपट्ट्या, हॉटेल रेस्तराँमध्ये गर्दीला उधाण