Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अजित पवारांचे विश्वासू, नंतर फडणवीसांचंही मन जिंकलं; लक्ष्मण जगतापांची राजकीय कारकीर्द

15

पुणे : पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (वय ५९) यांचं दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झालं. काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या लक्ष्मण जगताप यांनी पुढे राष्ट्रवादी आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश करत शहरातील राजकारणात आपलं स्थान भक्कम केलं. कर्करोगाशी झुंज देत असतानाही आमदार जगताप हे काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुंबईत पोहोचल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती.

आमदार लक्ष्मण जगताप हे कधीकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सर्वांत जवळचे सहकारी म्हणून परिचित होते. १९९९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याअगोदर १९९३- ९४ मध्ये महापालिकेचे स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही काँग्रेस पक्षातून झाली. १९९२ चा निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग १० वर्ष त्यांनी पिंपळे गुरव येथील प्रतिनिधीत्व केले. याशिवाय १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या काळात पिंपरी चिंचवडचं महापौरपदही त्यांनी भूषवलं होतं.

पंतप्रधान मोदी राणेंना ओरडले, म्हणाले, ‘तुमचं खातं काढून घेईन’; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादीकडून २००४ मध्ये मावळ लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी शेकापच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र त्या निवडणुकीत जगताप यांचा पराभव झाला. २००९ मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्त्वात आला आणि लक्ष्मण जगताप पहिल्याच निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवून ते आमदार झाले.

अजित पवारांचे निकटवर्तीय ते देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू

राजकारणात काळानुसार समीकरणे बदलतात, असं म्हटलं जातं. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांचे सर्वांत विश्वासू नेते अशी ओळख असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी भाजप प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांचंही मन जिंकलं. राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेली झालेली राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक महाविकास आघाडीसह भाजपने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या चुरशीच्या निवडणुकीत एका-एका मताला महत्व प्राप्त झालेलं असताना लक्ष्मण जगताप यांनी आजारी असतानाही मतदानासाठी हजेरी लावली आणि भाजपच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राज्यसभेची तिसरी जागा जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी हा विजय लक्ष्मण जगताप आणि भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.