Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नागपूर, दि. 7 : भारताला वैज्ञानिकांची गौरवशाली पंरपरा लाभली आहे. देशात विज्ञानाची ही परंपरा पुढे नेण्यात भारतीय विज्ञान काँग्रेसची भूमिका मोलाची ठरली आहे. आपण साऱ्यांनी ही गौरवशाली परंपरा पुढे नेऊ या, अशा शब्दात नोबेल पुरस्कार विजेत्या श्रीमती ॲडा योनाथ यांनी वैज्ञानिकांना साद घातली.
येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठात आयोजीत 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा आज समारोप झाला. याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून ॲडा योनाथ बोलत होत्या.
मुख्य कार्यक्रम स्थळी हा सोहळा पार पडला. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, नागपूर विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, भारतीय विज्ञान काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अरविंद सक्सेना आदी उपस्थित होते.
श्रीमती योनाथ म्हणाल्या की, मी माझे संशोधन नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरही 20 वर्षांपासून सातत्याने करीत आहे. संशोधकाने आपले संशोधन कधीही थांबवायचे नसते. या संशोधन कार्यात भारतीय वैज्ञानिक डॉ. तनया बोस, डॉ. वेंकटरमण रामकृष्णन यांची मदत झाली. भारतीय वैज्ञानिकांबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. माझे मार्गदर्शक डॉ. रामचंद्रन हे एक भारतीय वैज्ञानिक होते. त्यांच्याकडूनच मला महान भारतीय वैज्ञानिक परंपरेची ओळख झाली. हीच महान , गौरवशाली परंपरा पुढे नेण्यात 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसने मोलाची भूमिका बजावली आहे. हीच परंपरा आपण पुढे नेऊ या, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. विजयलक्ष्मी बिदरी म्हणाल्या की, नागपुरात झालेले हे राष्ट्रीय स्तरावरील आयोजन समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यास व विज्ञानाविषयी प्रेम निर्माण करण्यात मोलाचे ठरले आहे.
डॉ.श्रीमती विजयलक्ष्मी सक्सेना म्हणाल्या की, नागपुरातील आयोजनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन विज्ञानाचा सेतू निर्माण केला. प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेस आयोजन झाले. त्यास सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मध्यवर्ती संकल्पनेस अनुसरुन हे आयोजन यशस्वी झाले. 3 हजारांहून अधिक शोधनिबंध सादर झाले तर 50 हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले. सर्वच दृष्टीने हे आयोजन यशस्वी झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
कुलगुरु डॉ सुभाष चौधरी यांनी आपल्या भाषणात भारतीय विज्ञान काँग्रसच्या आयोजनात सहकार्यासाठी स्थानिक प्रशासन आणि शैक्षणिक संस्थाचे आभार मानले. 50 वर्षांनंतर थेट विद्यापीठाच्या शतकपूर्ती वर्षात विज्ञान महाकुंभाचे यशस्वी आयोजन पार पडल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
डॉ. अरविंद सक्सेना यांच्याकडे विज्ञान काँग्रेस मशाल सुपूर्द
या कार्यक्रमाच्या शेवटी मावळत्या अध्यक्ष डॉ विजयलक्ष्मी सक्सेना यांनी भारतीय काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ अरविंद सक्सेना यांच्याकडे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पुढील आयोजनाची मशाल सूपूर्द केली.
वैज्ञानिकांना पुरस्कार प्रदान
108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी विविध श्रेणींमध्ये यावेळी वैज्ञानिकांना सन्मानित करण्यात आले. सुवर्णपदके विजेत्यांची नावे खालील प्रमाणे
आशुत मुखर्जी मेमोरियल अवॉर्ड – प्रा. अजय कुमार सूद
डॉ. सी. व्ही. रमण जन्मशताब्दी पुरस्कार – प्रा. एस. आर. निरंजना
एस. एन. बोस जन्मशताब्दी पुरस्कार – प्रा. सुभाषचंद्र पारिजा
एस. के. मित्रा जन्मशताब्दी पुरस्कार – डॉ. रंजन कुमार नंदी
एच. जे. भाभा स्मृती पुरस्कार – डॉ. कौशल प्रसाद मिश्रा
डी. एस. कोठारी मेमोरियल पुरस्कार – डॉ. श्यामल रॉय –
अन्य पुरस्कार विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे
प्रो. आर. सी. मेहरोत्रा मेमोरियल लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड – डॉ. यू. सी. बॅनर्जी – एमिटी युनिव्हर्सिटी, मोहाली.
प्रो. एस. एस. कटियार एंडोमेंट लेक्चर अवॉर्ड – डॉ. केस्तुरू एस. गिरीश – तुमकूर विद्यापीठ, कर्नाटक.
प्रा. अर्चना शर्मा मेमोरियल अवॉर्ड इन प्लांट सायन्स – डॉ. राजीव प्रताप सिंग – बीएचयू, वाराणसी
जी. के. मन्ना मेमोरियल पुरस्कार – डॉ. बसंत कुमार दास – आय.सी.ए.आर. कोलकोता