Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजपच्या मुंबई कार्यालयातून सूत्र हलली; फडणवीसांच्या स्क्रिप्टने सगळेच हैराण, विखेंनाही चेकमेट?

6

नाशिक : नाशिक विधान परिषद निवडणुकीत नेमका कुणी कुणाचा गेम केला, थोरात-तांबे या कौटुंबिक संघर्षाला यानिमित्ताने सुरुवात झालीय का, पक्षाचे अधिकृत तिकीट मिळूनही पित्याने आपल्या मुलासाठी माघार का घेतली, या प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या भाषणात दडली असल्याचे दिसून येते.

‘सत्यजित तांबे यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार, असे लोक जास्त दिवस बाहेर ठेवले, की आमची नजर त्यांच्याकडे जाते,’ असे वक्तव्य फडणवीस यांनी तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केले होते. तेव्हापासूनच फडणवीस यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची संहिता लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या नाट्यात भल्याभल्यांचा ‘गेम’ झाला असून, एका राष्ट्रीय पक्षाची जाहीर नाचक्की, कौटुंबिक कलहाची ठिणगी आणि भाजपच्या भविष्यातल्या ‘गेम प्लॅन’ची चुणूक बघायला मिळाली. नाशिक पदवीधर निवडणूक काँग्रेससाठी सोपी असतानाही फडणवीसांच्या खेळीने हाताबाहेर गेली आहे. फडणवीसांच्या ‘गेम प्लॅन’मुळे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावान बाळासाहेब थोरात यांची राजकीय कोंडी झाली आहे.

म्हाडा प्रकल्पांच्या खर्चावर नजर; ५० कोटींवरील प्रकल्पांना सरकारची परवानगी आवश्यक

थोरात, तांबे हे काँग्रेसचे पिढ्यानपिढ्या निष्ठावान समजले जातात. अशा कुटुंबातील नव्या पिढीने दाखविलेल्या धाडसाची सध्या राज्यभर चर्चा आहे. हा मतदारसंघ पूर्वी भाजपचा बालेकिल्ला होता. डॉ. तांबेंनी तो काँग्रेसमय केला. तो पुन्हा मिळविण्यासाठी भाजपने सर्व पर्यायांचा विचार केला, तरीही त्यात यश येण्याची शक्यता नाही हे लक्षात येताच थेट तांबे कुटुंबाकडेच मोर्चा वळविला, त्यासाठी महत्त्वाचा दिवस ठरला तो ९ डिसेंबर. सत्यजित तांबे यांनी अनुवादित केलेल्या ‘सिटिझन विल’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आपले मामा बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले होते. फडणवीस यांच्या या कार्यक्रमातील उपस्थितीने काँग्रेससह सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यात वरील वक्तव्य करीत फडणवीसांनी थेट सत्यजित तांबेंवरच जाळे टाकले आणि येथेच नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कोंडीची बीजे पेरली गेली.

फडणवीसांच्या जाहीर संकेतामुळे महत्त्वाकांक्षी सत्यजित यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले. हे स्वप्न सत्यात उतरवण्याची संपूर्ण संहिता मग फडणवीस यांनी लिहिण्यास प्रारंभ केलेला दिसतो. डॉ. सुधीर तांबेंची उमेदवारी जाहीर होऊनही त्यांनी अर्ज न भरणे, भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज कोणालाही न देणे आणि माध्यमांसाठी शेवटच्या दिवसाचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ घडवून आणण्याची सर्व सूत्रे गुरुवारी भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयातून हलत होती.

एका दगडात दोन पक्षी

गुरुवारी नाशिकच्या विभागीय आयुक्तालयात घडलेल्या या नाट्यमय घडामोडीत भल्याभल्यांचा ‘गेम’ झाला. या नाट्याने काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची जाहीर नाचक्की तर झालीच, शिवाय तांबे व थोरात कुटुंबांतील कौटुंबिक कलहाची ठिणगी पडल्याचे चित्रही पाहायला मिळाले. दुसरीकडे भाजपच्या भविष्यातल्या ‘गेम प्लॅन’ची चुणूकही या नाट्यातून दिसून आली. भाजपने एकाच वेळी तांबेंना आमदारकीची लालूच दाखवित नगर जिल्ह्यातील विखेंनाही ‘चेकमेट’ केल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात रुग्णालयात असताना फडणवीसांनी काँग्रेसमधली ही सर्व ‘ऑपरेशन्स’ घडवून आणली आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.