Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Politics | नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. या सगळ्यातून सावरत आता महाविकास आघाडीने भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असलेल्या सत्यजीत तांबे यांच्याविरुद्ध मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे.
हायलाइट्स:
- मातोश्रीवर तातडीची बैठक
- नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत चर्चा
संजय राऊत यांच्या या इशाऱ्यानंतर मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे नाशिकमधील विजय काळसकर आणि विलास शिंदे हे पदाधिकारीही उपस्थित आहेत. ही बैठक सुरु असतानाच मातोश्रीवर नाशिक पदवी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटासह संपूर्ण महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद शुभांगी पाटील यांच्या पाठिशी उभी करण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आम्ही सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे म्हटले होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे.
मातोश्रीवर सुरु असलेल्या बैठकीत काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये झालेल्या जागवाटपाच्या सूत्रात आता बदल होऊ शकतो. त्यानुसार नाशिकची जागा आता ठाकरे गट किंवा राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील मातोश्रीवर असल्याने आता ठाकरे गट त्यांना पुढे करून कोणती खेळी खेळणार, हे पाहावे लागले. तसेच काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे पाठिंबा काढून घेतल्यास सत्यजीत तांबे आणि भाजप काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. परिणामी येत्या काही दिवसांमध्ये नाशिकच्या राजकारणात रंजक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ते कॉमन मिनिमम प्रोगामवर चालत होतं. तीन भिन्न विचारसरणीचे पक्ष असतानाही हे सरकार उत्तमप्रकारे चालले. तेव्हा आमच्यात चांगला समन्वय होता. विरोधी पक्षात काम करतानाही हा समन्वय राहिला पाहिजे. तरच आम्ही पुढच्या लढाया एकत्र लढू शकतो. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यासाठी काँग्रेस पक्षाला दोष देता येणार नाही. पण नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
‘सामना’तून महाविकास आघाडीच्या नेत्यांना कानपिचक्या
नाशिकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवरुन झालेल्या गोंधळावर शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षकांना भाजपविरुद्ध रोष व्यक्त करायचा होता. भाजपला सुशिक्षित वर्गाचा अजिबात पाठिंबा नाही व सगळेच शिक्षित त्यांच्या भगतगणांत मोडत नाहीत, हे दाखवायची आयतीच संधी मिळाली होती. पण फासे उलटे पडताना दिसत आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील गोंधळाचे चित्र समोर आले. या गोंधळास जबाबदार व्यक्ती कोण? की एकमेकांच्या पायात पाय अडकवून भाजपला मोकळे रान द्यायचे, असे आघाडीतील लोकांनी परस्पर ठरवून टाकले आहे का, असा खोचक सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.