Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईत ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपने निर्णायक डाव टाकला? चहल यांच्या ईडी चौकशीनंतर चर्चांना उधाण

8

मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असून सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोनाकाळात पालिकेत झालेल्या कथित गैरव्यवहाराबाबत ही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. मात्र चौकशीसाठी जरी इकबालसिंह चहल यांना बोलावण्यात आलं असलं तरी या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

मुंबई महानगरपालिकेची मुदत संपून अनेक महिने लोटल्याने लवकरच पालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी भाजप सोडत नसल्याचं दिसत आहे. याआधीच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या चौकशीची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता अखेर चहल यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलं आहे.

‘उसकी हार के चर्चे जीत से ज्यादा हैं’; महाराष्ट्र केसरीत पराभवानंतरही सोशल मीडियावर सिकंदरचीच चर्चा

कोणत्या प्रकरणात होणार चौकशी?

करोना काळात मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची कामे लाइफलाइन या कंपनीकडे देण्यात आली होती. ही कंपनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांच्या मालकीची असल्याचे बोलले जाते. या कंपनीकडून आरोग्य सेवा पुरवताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून याबाबतची कागदपत्रे घेऊन चहल यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे चहल यांच्या चौकशीच्या आधारे आगामी काळात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेदेखील चौकशीच्या फेऱ्यांत अडकू शकतात.

पालकांनो, मुलांची काळजी घ्या; वातावरणातील बदलामुळे मुलांमध्ये ‘फ्लू’चे प्रमाण वाढले

महापालिका निवडणूक आणि भाजप

मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचं स्वप्न पक्षाच्या अनेक नेत्यांकडून जाहीरपणे बोलावून दाखवण्यात आलं आहे. मागील निवडणुकीतही भाजपने ही महापालिका जिंकण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. मात्र शिवसेनेपेक्षा अवघ्या दोन जागा कमी मिळाल्या आणि भाजपचं हे स्वप्न भंगलं. मात्र यावेळी कोणतीही कसर ठेवू नये, असा भाजप नेत्यांचा इरादा आहे. परंतु शिवसेनेतील बंडखोरीनंतरही स्वबळावर महापालिका जिंकली जाऊ शकते की नाही, याबाबत भाजपच्या गोटात साशंकता असल्याचं चित्र आहे. त्यातूनच महापालिका निवडणुकांना उशीर केला जात असल्याचा आरोप होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात मोगलांचे राज्य असल्यासारखी वागणूक मिळत असून कोणताही आवाज ऐकला जात नाही. लोकशाही संपून टाकली असून ठाणे, मुंबई आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका लावण्याची हिंमत नाही, अशी टीका नुकतीच ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी केली होती.

दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक आणि त्याआधी पालिकेच्या कारभारावरून सुरू झालेल्या चौकशीमुळे राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. याबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.