Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- गडचिरोली पोलिस दलाला मोठं यश
- जहाल नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण
- २०१९ ते २०२१ सालामध्ये एकूण ४३ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण
शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत नक्षलवाद्यांचा झालेला खात्मा तसंच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षलवाद्यांसह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलं आहे. त्याच बरोबर आत्मसर्पित नक्षलवाद्यांचे पोलिस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे नक्षलवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करत आहेत. नुकतंच ८ लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी विनोद उर्फ मनिराम नरसु बोगा वय ३२ वर्ष रा.बोटेझरी,पोमके गॅरापत्ती ता.कोरची जि.गडचिरोली व कविता ऊर्फ सत्तो हरीसिंग कोवाची वय ३३ वर्ष रा.गौडपाल ता मानपूर जि.राजनांदगाव ( छ.ग. ) यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.
विनोद बोगा व कविता कोवाची हे दोघे पती-पत्नी असून विनोद बोगा हा कोरची दलममध्ये एसीएम पदावर दलम डॉक्टर म्हणून कार्यरत होता आणि त्याची पत्नी कविता कोवाची ही पार्टी मेंबर या पदावर टिपागड दलममध्ये कार्यरत असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.
दोघांवरही विविध गुन्हे दाखल
विनोद बोगा याच्यावर खूनाचे १३, चकमकीचे २१, जाळपोळ ०१ आणि इतर ०५ असे गुन्हे दाखल असून पत्नी कविता हिच्यावर चकमकीचे ०५, जाळपोळ ०१ व इतर ०३ असे गुन्हे दाखल आहेत. शासनाने विनोद बोगा याच्यावर ६ लाख रुपयाचे तर कविता कोवाची हिचेवर २ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
सन २०१९ ते २०२१ पर्यंत ४३ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण
गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबवल्यामुळे सन २०१९ ते २०२१ सालामध्ये एकूण ४३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ४ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०३ उपकमांडर, ३३ सदस्य व ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. सदर दोन्ही नक्षलींचे आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्याबाबतची कारवाई गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली धानोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी पार पाडून मोठी भूमिका बजावली आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर दोन जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालीवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलिस दलास मोठं यश प्राप्त झालं आहे.
गडचिरोली पोलिस दलाने राबवली ही योजना
आतापर्यंत ६४७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून गडचिरोली पोलिस दलाच्या माध्यमातून एकुण १२७ आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना भूखंड वाटप, १०७ आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना घरकुल वाटप, ६४३ आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना आधारकार्ड वाटप, ३६ महिला आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना शिलाई मशिनचे वाटप, २३ आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना शेळी पालन व इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
त्यामुळे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे प्रमाण वाढत असून ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सन्मानाने जीवन जगत आहेत. ‘विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे नक्षलवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसंच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल. तसंच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्वीकारावा,’ असं आवाहन गडचिरोली पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी केलं आहे.