Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोटनिवडणुकीसाठी आघाडीची तयारी; चिंचवडसाठी शिवसेना आग्रही तर कॉंग्रेसला कसबापेठचा प्रस्ताव

18

मुंबई : राज्यात येत्या २६ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन भाजपकडून होत असताना महाविकास आघाडीने या दोन्ही जागा लढविण्याची तयारी केली आहे. शिवसेनेने चिंचवडचा आग्रह धरला असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससमोर कसबापेठचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार मागे घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता. त्यामुळे भाजपने कसबापेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन महाविकास आघाडीला केले आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून गेले होते. त्यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत असल्याने भाजप या दोन्ही जागा लढविणार आहे.

या पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील आदींनी मंगळवारी रात्री उशिरा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत राष्ट्रवादीने दोन्ही मतदारसंघांत आमची संघटनात्मक ताकद जास्त असल्याने या जागा पक्षाला मिळाव्यात, अशी मागणी केली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी चिंचवडची जागा राहुल कलाटे यांच्यासाठी सोडावी, असा आग्रह धरल्याचे समजते.

या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेना भवनात ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘महाविकास आघाडी म्हणून पुण्यातील दोन्ही जागा लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र, महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत. सर्वांची आपापली एक भूमिका आहे. आम्ही संघटनावाढीसाठी दावे करत असतो. अजित पवार यांनीही आपले म्हणणे मांडले आहे. पण चिंचवडची जागा शिवसेनेला मिळावी, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कसबापेठची जागा लढवावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे,’ राऊत यांनी सांगितले. चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी, अशी पिंपरी-चिंचवड शहरातील आमच्या शिवसैनिकांची मागणी आहे. सन २०१९मध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिवंगत लक्ष्मण जगताप यांना अटीतटीची लढत दिली होती. त्या निवडणुकीत कलाटे यांचा थोडक्यात पराभव झाला असला, तरी यंदा ही जागा आम्ही जिंकू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

प्रकाश आंबेडकरांच्या युतीबाबतही चर्चा

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीबरोबर मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेने जाहीर केलेल्या युतीबाबतही अजित पवार, सुनील तटकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. आंबेडकर यांच्या यापूर्वीच्या राजकीय अनुभवाबाबत पवार, तटकरे यांनी उद्धव यांना सांगितले. तसेच महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांमधील ज्या पक्षासोबत जे इतर पक्ष येतील त्या पक्षांना संबंधित पक्षाने आपल्या कोट्यातून जागा द्याव्यात, या सूत्राचीही आठवण ठाकरे यांना करून दिल्याचे समजते.

‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी’

‘एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. मुंबईत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने मुंबईतील पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे ही परंपरा सगळ्यांनी कायम ठेवावी आणि जपावी,’ असे आवाहन मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यावर खासदार संजय राऊत यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली. ‘महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि त्याची सध्या कशी पायमल्ली होत आहे, हे कुणी सांगायचे? पंढरपूर आणि नांदेडच्या पोटनिवडणुकीत ही संस्कृती कुठे दिसली नाही. मात्र, अंधेरीत दिसली त्याला वेगळी कारणे होती,’ असे ते म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.