Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पठाणने बॉलिवूडला सावरले

कोविड काळापासून बॉलीवूडची स्थिती खालावली होती, अनेक थिएटर्स बंद पडली होती. कलाकार बेरोजगार झालेले. एवढेच नव्हे बॉलिवूड चित्रपटांचा दर्जा घसरल्याची नाराजीही प्रेक्षकांनी व्यक्त केली. दाक्षिणात्य सिनेमांचे अनेक रीमेक गेल्या काही काळात बनवले गेले. त्यामुळे बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेंडही मोठ्या प्रमाणात केला गेला. मात्र पुन्हा एकदा शाहरुख खानने बॉलिवूडच्या बुडणाऱ्या बोटीला सावरले आहे. पठाणने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाल केली. मीडिया रिपोर्टनुसार, करोनानंतर आर्थिक अडचणींमुळे बंद पडलेली २५ चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाली आहेत.
पठाणला बॉलिवूडची नव्हे तर बॉलिवूडला ‘पठाण’ची होती गरज

तसे पाहिले जर पठाणला बॉलिवूडची नव्हे तर बॉलिवूडला शाहरुख खानच्या ‘पठाण’ची गरज होती. गेल्या काही काळापासून एवढी क्रेझ निर्माण झालेला बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला नव्हता. ९० च्या दशकात ज्याप्रमाणे शाहरुखने स्वत:ला रोमान्सचा बादशाह सिद्ध केले होते, त्याप्रमाणे वयाच्या ५७ व्या वर्षी धमाकेदार अॅक्शन करत सिद्ध केले की तो कोणत्याही विषयांच्या सिनेमांमध्ये चपखल बसू शकतो. पठाण मधील त्याच्या प्रत्येक सीनचे कौतुक होत आहे.
शाहरुखने जोखीम उचलल्याने होतेय कौतुक

शाहरुख खानने वयाच्या ५७ व्या वर्षी जबरदस्त ॲक्शन फिल्म करून जोखीम उचलल्याने, या गोष्टीचे सर्वाधिक कौतुक होते आहे. त्याने ही जोखीम पत्करली आणि त्यात तो यशस्वी झाला, असे म्हटले तरी वागवे ठरणार नाही. सोशल मीडियावर या सिनेमातील त्याचे ॲक्शन सीनचे कौतुक होते आहे. जेव्हा तो मोठ्या स्क्रिनवर शत्रूसोबत दोन हात करतो आणि लगेचच पुढील सीनमध्ये विनोदी सीन करताना दिसतो, तेव्हा दोन्ही सीनमध्ये बदलणारी त्याची देहबोली आणि हावभाव यावर चाहते फिदा आहेत. सिनेमातील जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण यांचेही ॲक्शन सीन प्रेक्षकांना आवडले.
याला म्हणतात कमबॅक!

शाहरुख खानने तब्बल ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर जबरदस्त कमबॅक केले. त्याचा २०१८ साली आलेला ‘झिरो’ सिनेमा फ्लॉप ठरलेला. त्यावेळी शाहरुखचे करिअर संपले अशा गप्पाही मारल्या गेल्या. अशा प्रतिक्रिया उमटू लागलेल्या की, आता किंग खानने निवृत्ती घ्यावी. अशा परिस्थितीत शाहरुखने ‘पठाण’मधून धमाकेदार कमबॅक करत अनेकांची तोंडं बंद केली आहेत. दरम्यान शाहरुखने केवळ सुपरहिट कमबॅक केले नाही तर त्याचे भविष्यही सुरक्षित केले. ‘पठाण’ हा त्याच्या करिअरसाठी महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या कथानकामुळे तो स्पाय युनिव्हर्सच्या पुढील चित्रपटात नक्कीच दिसेल.
बॉलिवूडची टिपिकल मसाला फिल्म नाहीये पठाण

शाहरुख-दीपिका स्टारर ‘पठाण’ची खास बाब म्हणजे हा सिनेमा बॉलिवूडमध्ये येणाऱ्या टिपिकल मसाला फिल्मच्या श्रेणीतील सिनेमा नाही. यामध्ये प्रेक्षकांना विविध पैलू पाहायला मिळतील. यामध्ये देशभक्ती, ॲक्शन , मजेदार गाणी आणि कमालीचे ट्विस्ट पाहायला मिळतील. सिनेमातील कलाकारांचे जेवढे कौतुक होत आहे, तेवढेच कौतुक पठाणचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचेही केले जातेय. सिनेमाचे निर्मातेही ‘पैसा वसूल’ सिनेमामुळे आनंद व्यक्त करत आहेत.
पठाणमध्ये आहे सर्वकाही

दीपिका पादुकोणच्या ‘पठाण’ सिनेमात कथानक, संवाद, ॲक्शन, संगीत, कॉस्ट्यूम या सर्वच गोष्टी योग्य पद्धतीने आहेत. खलनायक आणि हिरो सर्वांनीच चांगले काम केल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. पठाणशी दोन हात करणाऱ्या जॉनच्या फायटिंगलाही तोड नाही! शाहरुखशिवाय जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले. तर या सर्वांना एकत्र आणून पठाण बनवणाऱ्या सिद्धार्थ आनंद यांचेही कौतुक होते आहे.
स्पाय युनिव्हर्स

‘पठाण’नंतर यशराज फिल्म्सकडून स्पाय युनिव्हर्सची अधिकृत घोषणा केली आणि लोगोही जारी केला आहे. हृतिक रोशनचा वॉर तसंच सलमान खानचा टायगर या स्पाय युनिव्हर्सचा भाग असेल. पहिल्यांदा या सर्व सिनेमाचे धागेदोरे ‘पठाण’मध्ये एकत्र पाहायला मिळाले. बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे स्पाय युनिव्हर्स पाहायला मिळणार आहे. अर्थातच स्पाय युनिव्हर्समधील सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सलमान आणि शाहरुखला एकत्र पाहिल्यानंतही प्रेक्षकांनी कमालीचा आनंद व्यक्त केला.
संगीत आणि दिग्दर्शन

‘पठाण’च्या प्रत्येक पैलूबाबत चर्चा केल्यास सिनेमाचे कथानक सिनेमाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. श्रीधर राघवन आणि सिद्धार्थ आनंद सिनेमाचे लेखन केले असून सिनेमामध्ये संवाद कमी आणि जास्त ॲक्शन पाहायला मिळाली. सिनेमातील वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्सविषयी चाहत्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान या सिनेमाचे संगीत विशाल-शेखर यांचे असून ‘बेशरम रंग’ आणि ‘झुमे जो पठाण’ या गाण्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. बेशरम रंगवरुन जरी वाद झाला असला तरी युट्यूबवर या गाण्याने मिलियन्समध्ये व्ह्युज मिळवले आहेत.
वर्ल्डवाइड कमावले १०० कोटी

शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाने देशातीलच नव्हे तर परदेशातही ओपनिंग डे कलेक्शनचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या सिनेमाने पहिल्याच दिवशी परदेशात ३५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. भारतात पहिल्या दिवशी पठाणचे नेट कलेक्शन ५५ कोटींचे आहे तर ग्रॉस कलेक्शन ६५.९६ कोटींचे आहे. पठाणने ‘KGF: Chapter 2’ च्या पहिल्या दिवसाच्या ५२ कोटींच्या कमाईचा विक्रम मोडला आहे. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी जगभरात १००.९६ कोटी रुपये कमावले आहेत.