Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पठाण सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील बेशरम रंग गाण्यात दीपिका पादुकोण हिनं घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वादंग उठला होता. या वादाला धार्मिक रंग देण्यात येऊन विरोधकांनी सिनेमावर आणि शाहरुख खानवर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती. परंतु सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देशा-परदेशातून त्याला ज्या पद्धतीनं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे, त्यामुळे विरोधकांच्या बहिष्कारातील हवा निघून गेली आहे.
पठाण सिनेमानं दोन दिवसांत जगभरातून २१९ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. तर पहिल्या दिवशी सिनेमानं १०६ कोटी रुपये कमावत एक नवीन विक्रम रचला. सिनेमाला प्रेक्षकांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्यामुळे बॉलिवूडमध्ये उत्साह संचारला आहे. पठाण सिनेमाला मिळत असलेल्या यशाबद्दल प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
अतुल कुलकर्णी यांचं ट्विट
अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पठाण सिनेमाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अतुल यांनी पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यातील भगव्या रंगाची बिकिनी घातलेली दीपिका आणि शाहरुख यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अतुल यांनी फक्त पठाण असं लिहित लाल रंगाच्या हार्टचे इमोजी पोस्ट केले आहेत.
पठाण सिनेमातील गाण्यातील याच दृश्यावरून वादंग निर्माण झाला होता. त्या वादाला धार्मिक रंग देत सिनेमावर हिंदुत्ववादी संघटनांनी जातीय रंग दिला होता. इतकंच नाही तर सिनेमावर आणि शाहरुख खानवर बहिष्काराची मोहिमही सोशल मीडियावर राबवण्यात आली होती. देशात अनेक ठिकाणी सिनेमाच्याविरोधात उग्र आंदोलन झाली होती. काही राजकीय नेत्यांनी या वादात उडी घेत सिनेमागृहांमध्ये सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी दिली होती. मात्र बहिष्काराच्या मोहिमेचे पुरता फज्जा पठाण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर उडाला.संपूर्ण देशातून सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे. बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन विक्रम या सिनेमानं रचले आहेत. विरोधकांना न जुमानता पठाणनं जे यश मिळवले आहे, त्याबद्दल अतुल यांनी या ट्विटमधून संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, आमिर खान याच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या लाल सिंह चड्ढा सिनेमाला सोशल मीडियावरील बहिष्कार मोहिमेचा जबरदस्त फटका बसला होता. या सिनेमातील संवाद लेखन अतुल कुलकर्णी यांनी केले होते.