Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
▶️ निर्यात व्यवस्थेत कोल्हापूर जिल्हा देशात अग्रेसर बनावा
▶️जिल्ह्यातील नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावे
▶️कोल्हापूर – पुणे, कोल्हापूर – नागपूर, कोल्हापूर – सांगली, कोल्हापूर – रत्नागिरी मार्ग दर्जेदार करुन प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी प्रयत्नशील
▶️जिल्ह्यात रोप वे, वातानुकूलित बस सह विकास प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य
▶️जल, वायू, ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करून जिल्ह्याचा विकास साधावा
कोल्हापूर, दि. २८ (जिमाका) : कोणत्याही भागाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले व दर्जेदार रस्ते हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर – पुणे, कोल्हापूर – नागपूर, कोल्हापूर – सांगली, कोल्हापूर – रत्नागिरी ह्या महामार्गाची निर्मिती अत्यंत चांगली व दर्जेदार करुन दळणवळणाच्या सुविधा अत्यंत गतिमान करण्यासाठी शासन कटिबंध असून कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
रत्नागिरी ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चौपदरीकरण (भाग आंबा ते पैजारवाडी पॅकेज -2) (2191 कोटींचा प्रकल्प- 45.200 किमी) तसेच रत्नागिरी ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चौपदरीकरण (भाग पैजारवाडी ते चोकाक पॅकेज 3) (2131 कोटींचा प्रकल्प-32.960 किमी) यांचे भूमिपूजन आणि पंचगंगा नदीवरील कोल्हापूर प्रवेशासाठी उड्डाणपूल (बास्केट ब्रिज) (180 कोटींचा प्रकल्प- 1.2 किमी) ची पायाभरणी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 कोल्हापूर (शिरोली) ते सांगली (अंकली) या विभागाचे चौपदरीकरण (840 कोटींचा प्रकल्प- 33.825 किमी) कामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, संजय पाटील, आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, पी.एन.पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक वसंत पंधारकर, व्यवस्थापक गोविंदप्रसाद बैरवा, माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, शौमिका महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांच्या काम करण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर येत्या काळात भारत शक्तीशाली देश होईल. तर विकासाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा देशात अग्रेसर होईल, असा विश्वास व्यक्त करुन निर्यात व्यवस्थेत देखील कोल्हापूर जिल्हा देशात अग्रेसर बनण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
देशाच्या विकासासाठी देशांतर्गत दर्जेदार रस्त्यांचे जाळे तयार करण्यात येत आहे. कोल्हापूर – सांगली रस्ता हा पुढील कित्येक वर्षे टिकून राहील असा सिमेंट काँक्रिटचा करण्यात येईल, त्याचप्रमाणे कोल्हापूर – पुणे, कोल्हापूर – नागपूर, कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावरील रस्ते रुंद आणि दर्जेदार होणार असून यामुळे प्रवासाचा वेळ वाचण्याबरोबरच शेतमालाची निर्यातवाढ होईल, शेतकरी, तरुण, नागरिक, उद्योजकांची सोय होवून पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, असे श्री. गडकरी म्हणाले.
दिल्ली आणि अन्य शहरांच्या तुलनेत निसर्ग सौंदर्याने समृध्द असणाऱ्या कोल्हापूरची हवा शुद्ध आहे. जल, वायू, ध्वनी प्रदूषण रोखून जिल्ह्याचा विकास साधा. प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर भर द्या. तंत्रज्ञानाचा वापर करुन कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ऑटोमोबाईल हब बनण्यासाठी प्रयत्न करा. शहरातील रस्ते रुंद व स्वच्छ, सुंदर बनवा, मासिक पास मध्ये वातानुकूलित बसेस सुरु करा, असे सांगून वातानुकूलित बसेस, रोप – वे, केबल कार, रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल आदी विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत, त्यांना मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही ही श्री. गडकरी यांनी दिली. तसेच येथील निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा व ड्राय पोर्ट ची सुविधा लॉजीस्टिक विविध वस्तूंच्या पार्क मध्ये देण्यासाठीही निश्चित प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छांची चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुभेच्छा संदेश देताना म्हणाले, दर्जेदार रस्ते आणि वेगवान विकास या विचारांनी नितीन गडकरी कार्यरत आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणेच देशात अनेक महत्त्वपूर्ण मार्ग त्यांच्या प्रयत्नातून होत आहेत. यामुळे राज्याचा विकास साधला जाईल. बास्केट ब्रिज आणि कोल्हापुर- रत्नागिरी महामार्गामुळे वेळेची बचत होवून नागरिकांची सोय होईल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापूरसह राज्यातील अन्य भागांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भविष्यात देखील नितीन गडकरी यांच्या सहकार्याने राज्याचा विकास साधला जाईल.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या वतीने जिल्ह्याच्या विकासासाठी आजवर आवश्यक त्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. पन्हाळा व अन्य आवश्यक ठिकाणी रोप वे व्हावा, असे सांगून यापुढेही केंद्र सरकारच्या वतीने नितीन गडकरी यांनी यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर विमानतळाचा विकास होत असून येत्या काळात याठीकाणाहून वाढणारी वर्दळ विचारात घेवून विमानतळ मार्गाचे देखील चौपदरीकरण व्हावे. जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी जिल्ह्यातील विविध विकास कामे, प्रकल्पांना गती मिळावी, अशी अपेक्षा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त करून जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे मालवाहतुकीच्या तसेच प्रवासी वाहतुकीच्या वेळेत बचत होऊन जिल्ह्याच्या विकासालाही मदत मिळेल असे त्यांनी सांगितले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, ज्या देशांमध्ये रस्त्यांचा विकास झाला आहे त्या देशांचा झपाट्याने विकास झाल्याचे दिसून येते. कोल्हापूरची ओळख आता विकासाचा जिल्हा म्हणून होत आहे. बास्केट ब्रीजच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाला हातभार लागेल. पूर परिस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा श्री. महाडिक यांनी व्यक्त केली. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात अनेक सोयी सुविधा देणे आवश्यक आहे. शहराच्या प्रवेश द्वारावर दर्जेदार भव्य कमान, विमानतळ तसेच शहरातील महत्वाच्या मार्गांचे चौपदरीकरण व्हावे, इलेक्ट्रिक बसेस द्याव्यात, पन्हाळा, गगनबावडा, जोतिबा याठिकाणी रोप वे ची सुविधा व्हावी, कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या महामार्गांसाठी भरघोस निधी मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी खासदार संजय मंडलिक यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्नशील असून जिल्ह्यातील सहापदरी महामार्ग दर्जेदार पद्धतीने व्हावेत, असे सांगितले. तर कोल्हापूरच्या विकासात बास्केट ब्रीज महत्वपूर्ण ठरेल, असे सांगून लॉजेस्टिक पार्क हातकणंगले तालुक्यात व्हावा, अशी अपेक्षा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी मनोगतातून सांगली जिल्ह्यातील विकासकामांची माहिती देवून सहकार्याची अपेक्षा केली.
0000