Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली काल (२९ जानेवारी ) पुण्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी आणि उमेदवारी शहराध्यक्ष संजय मोरे यांनी द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुखांकडे केली आहे. हा निरोप घेऊन संपर्क प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
तर, दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणूक जर काँग्रेस लढण्याची मागणी करत असेल तर शिवसेनेने का लढवू नये? असा सूर या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आळवला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक शिवसेना लढणारच, असं पदाधिकारी सांगत आहेत.
मविआत बिघाडी?
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने लढवण्याची तयारी पूर्ण केली असून काँग्रेसकडून इच्छुक असणारे रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज देखील केला आहे. त्यातच आता शिवसेनेने कोणत्याही परिस्थितीत कसब्याची जागा लढवण्याची तयारी दाखवल्याने महाविकास आघाडीत संघर्ष निर्माण होण्याचे चिन्ह आहेत.
दरम्यान, या मतदारसंघातूनच शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे हे देखील इच्छुक आहेत. विशाल धनवडे यांनी २०१९ मध्ये बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना १३ हजार ९८९ इतकी मतंही मिळाली होती. ते पुन्हा एकदा या मतदारसंघातून इच्छुक आहेत.
मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चिंचवड मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक असल्याचं गणित मांडत कसब्यातून नव्हे तर चिंचवडमधून शिवसेनेला उमेदवारी मिळावी, असं म्हटल्याने कसब्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्यानंतर बैठक घेऊन पुण्यातील शिवसैनिकांनी कसब्यात निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचा निरोप पक्षप्रमुखांना पाठवला आहे.. यावर आता काय निर्णय होणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.