Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Anil Parab Vs Kirit Somaiaya | या इमारतीत मी लहानाचा मोठा झालो. आता या इमारती म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाही. सोसायटीची जागा मला वापरायला दिली होती. रहिवांशाच्या विनंतीवरुन जनसंपर्क कार्यालयासाठी सोसायटीची जागा वापरत होतो, असा दावा अनिल परब यांनी केला. यानंतर ते म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. जवळपास तीन तास ही चर्चा सुरु होती.
हायलाइट्स:
- पाडकामाची कारवाई करण्यात आलेल्या कार्यालयाशी माझा संबंध नाही
- म्हाडाने मला तसे लेखी पत्र दिले आहे
यानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवला. पाडकामाची कारवाई करण्यात आलेल्या कार्यालयाशी माझा संबंध नाही. म्हाडाने मला तसे लेखी पत्र दिले आहे. त्या कार्यालयाचा आणि जागेशी माझा कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे किरीट सोमय्या तोंडघशी पडले आहेत. त्यांचे आरोप म्हाडाने खोटे ठरवले आहेत. म्हाडाकडे इमारतीच्या नकाशाची मूळ कॉपीही नाही. मूळ नकाशामध्ये दिलेल्या गोष्टींचे उल्लंघन झाले असेल तरच संबंधित बांधकाम अनधिकृत ठरते. पण म्हाडाकडे नकाशाच नव्हता, मग ते बांधकाम अनधिकृत कसे ठरवले गेले. म्हाडाने हे नकाशे आठ दिवसांत शोधले नाहीत तर मी म्हाडावर हक्कभंगाचा गुन्हा दाखल करेन. कोणतेही तांत्रिक पुरावे नसताना म्हाडाच्या ज्या अधिकाऱ्याने मला नोटीस पाठवली त्याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी मी केली आहे. म्हाडाने मला पाठवलेली नोटीस मागे घेतली आहे, असेही अनिल परब यांनी सांगितले.
म्हाडाच्या कार्यालयात जाण्यापूर्वी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मी शिवसेनेतून (ठाकरे गट) बाहेर पडावे, यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला. मला बदनाम करण्यासाठी वारंवार असे प्रयत्न सुरु आहेत. अनिल परब यांना टार्गेट केलं म्हणजे उद्धव ठाकरे यांना टार्गेट केल्याचे दाखवायचे. उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसांना लक्ष्य केले जात आहे. बाकीचे लोक त्यांच्या गळाला लागले. आम्हालादेखील गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण काही लोक दबावाला बळी पडत नाहीत, पक्ष बदलायला तयार नाहीत. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. किरीट सोमय्या यांनी अशाचप्रकारे नारायण राणे ते यशवंत जाधव अशा अनेकांवर आरोप केले होते. पण आता हे सर्वजण त्यांच्या गटात गेल्यापासून किरीट सोमय्या त्यांच्याबाबत एकही शब्द काढत नाहीत, असे अनिल परब यांनी म्हटले.
नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार, तेव्हा किरीट सोमय्या येणार का; अनिल परबांचा सवाल
पाडकामाची पाहणी करायला किरीट सोमय्या हे म्हाडाचे मुकादम आहेत का, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला. म्हाडाचे अधिकारी किरीट सोमय्या यांचं का ऐकतात? उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या बंगल्यातील पाडकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. मीच आता अधिकाऱ्यांना घेऊन हे बांधकाम पाडण्यासाठी जाणार आहे. तेव्हा किरीट सोमय्या पाहणी करायला येणार का, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
किरीट सोमय्यांचा म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर दबाव: अनिल परब
रहिवांशाच्या विनंतीवरुन जनसंपर्क कार्यालयासाठी सोसायटीची जागा वापरत होतो. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा किरीट सोमय्यांनी म्हाडा, लोकायुक्त यांच्याकडे जाऊन माझं अनधिकृत कार्यालय आहे हे भासवून मला नोटीस द्यायला लावली. म्हाडाच्या नोटीसवर मी ही जागा माझी नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तेव्हा म्हाडाने नोटीस मागे घेतली. यानंतर म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांनी कार्यालयाचे बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज केला. म्हाडाने त्याला नकार दिला. यासाठी किरीट सोमय्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत होते, असा आरोप अनिल परब यांनी केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.