Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
२०१४ ला झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये अण्णा बनसोडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र, २०१९ चा निवडणुकीत अजित पवार यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ते पुन्हा पिंपरी मतदार संघाचे आमदार झाले. त्यांच्या आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीने ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतात की काय अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर संमर्थक म्हणून ओळखले जातात. बनसोडे यांनी जर शिंदे गटात प्रवेश केला तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे. कारण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का सहन करावा लागणार आहे. अण्णा बनसोडे यांनी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी लढवणार, हे आता येणारा काळच स्पष्ट करेल.
काही दिवसांपासून अण्णा बनसोडे आणि अजित पवार यांचं बिनसले होते. पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढचं तिकीट दुसऱ्या उमेदवाराला दिले जाणार आहे, अशी चर्चा आहे. अण्णा बनसोडे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अंत्यविधीवेळी देखील ते मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे शिंदे गटात गेले तर उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे अण्णा बनसोडे शिंदे गटात जातील, अशी चर्चा आता रंगली आहे.
कोण आहेत अण्णा बनसोडे?
अण्णा बनसोडे हे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सामर्थ्यशाली नेते आहेत. २००९ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक ते आमदार असा अण्णा बनसोडे यांचा प्रवास राहिला आहे. या काळात अजित पवारांच्या जवळचा नेता म्हणून बनसोडे ओळखले जाऊ लागले होते. मात्र, गेल्या काही काळात अजित पवार आणि अण्णा बनसोडे यांच्यात दरी निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. हीच शक्यता गृहीत धरून अण्णा बनसोडे यांनी एकनाथ शिंदे यांना भेटून पर्यायांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे.