Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आंगणेवाडी जत्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षाची जाहीर सभा पार पडली. आजवर ही जत्रा शिवसेनेच्या मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या उपस्थितीने चर्चेत असायची मात्र ही परंपरा भाजपने खंडित केली. मुंबई ठाण्याच्या निवडणूका नजरेसमोर ठेऊन भाजपाने गावागावात गाड्या सोडून सभेसाठी कार्यकर्ते आणलेत. यात एसटी महामंडळ आणि खासगी गाड्या सोडण्यात आल्या होत्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यातून भाजपा कार्यकर्ते या सभेला आले होते. सुमारे १५००० लोक बसतील अशी बैठक व्यवस्था होती. पाचशे पदाधिकारी बसतील असे महाकाय स्टेज, अशा पद्धतीने भाजपच्या सभेची तयारी करण्यात आली होती.
आंगणेवाडी जत्रेतील या वर्षातले विशेष म्हणजे मंदिराकडे जाणारे सर्वच रस्ते इतक्या वर्षात पहिल्यांदाच गुळगुळीत करण्यात आले होते. भाजपा नेते आणि राज्याचे बांधकाम मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांनी यावेळी रस्त्यांकडे विशेष लक्ष दिला. सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी खर्च करून खड्डे मुक्त आणि रुंद रस्ते करण्यात आले. त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली नाही. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची रोड डिप्लोमसी भाजपाला निश्चित फायद्याची ठरेल अशी चर्चा ऐकायला मिळाली.
अख्या कोकणचे पोलीस आंगणेवाडीत
कोकणातील ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस फौज आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस फौज या जत्रेत तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्यासह ३ अतिरिक्त पोलीस अधीक्षक या सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन पाहत होते. शेकडो अधिकारी आणि १ हजारच्या जवळपास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
नारायण राणेंनी भाजपा कार्यालयात जाणे टाळले
आंगणेवाडीमध्ये सर्वच पक्षांनी आपली कार्यालयं थाटली होती. भाजपाने देखील मोक्याच्या ठिकाणी आपले संपर्क कार्यालय उभे केले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रतिवर्षीप्रमाणे भराडी देवीच्या दर्शनासाठी आलेत. मात्र, भाजपा कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी थांबले असताना देखील त्यांनी तेथे जाणे टाळले. याची एकच राजकीय चर्चा आंगणे वाडीत ऐकायला मिळत होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रताप सरनाईक उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या जत्रेत हजेरी लावत भराडी देवीचे दर्शन घेतले. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, अनिल परब, वैभव नाईक यांनी एकत्रित जत्रेत हजेरी लावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, विनोद तावडे आदींनी भराडी देवीचे दर्शन घेतले.
या जत्रेत व्हीआयपिंच्या सिक्युरिटीचा सामान्यांना फटका बसला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आल्यानंतर वाहतूक व्यवस्था काही काळ रोखण्यात आली. त्यामुळे सामान्य नागरिकांना दीड किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागला. परिणामी अनेक वृद्ध नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.