Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Shailesh Tilak in Pune | कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता होती. मात्र, भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने नाराजी निर्माण झाली आहे.
हायलाइट्स:
- शैलेश टिळक यांनी आम्हाला पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे म्हटले होते
- शैलेश टिळक त्यांची नाराजी दाखवायची एकही संधी सोडत नाहीत
- शैलेश टिळक यांच्या या पवित्र्यामुळे भाजप नेते सावध झाले आहेत
त्यानंतर आता महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली आहे. या भेटीने आता राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. शैलेश टिळक आज हेमंत रसाने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे टिळक नाराज असल्याचे चर्चा सुरु आहेत. अशात ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतलेली भेट हा कसबा पोटनिवडणूक नवा ट्विस्ट ठरू शकतो.
या भेटीनंतर संजय मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक या २०१९ साली सेना-भाजप युतीत निवडून आल्या होत्या. आता मुक्ता ताईंच्या निधनानंतर त्यांच्या घरात उमेदवारी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. त्या दृष्टीने पाऊल उचलली जात आहे. पण शैलेश टिळक किंवा कुणाल यापैकी कोणालाच उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे ते नाराज आहेत. म्हणून मैत्रीच्या नात्याने आम्ही त्यांना भेटायला आलो.’ असं संजय मोरे म्हणाले आहेत.
कसब्यात ब्राम्हण समाजाच्या नाराजीचा भाजपला फटका
दरम्यान, हेमंत रासने यांच्या उमेदवारी नंतर कसब्यात भाजपचा पारंपरिक मतदार असलेला ब्राम्हण समाज नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने कसब्यात बॅनर लावण्यात आले असून या बॅनरच्या माध्यमातून ब्राम्हण समाजावर अन्याय झाल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचेही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलेले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे टिळकांच्या भेटीला
शैलेश टिळक यांच्या नाराजीमुळे कसब्यातील भाजपचा हक्काचा मतदार असलेला ब्राह्मण समाज प्रचंड नाराज झाल्याची चर्चा आहे. याची दखल आता भाजपकडून घेण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी संध्याकाळी केसरीवाडा येथे शैलेश टिळक यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून टिळक कुटुंबीयांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांची सध्या काही नेत्यांसोबत अज्ञातस्थळी बैठक सुरु आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आनंद दवे टिळकांच्या भेटीला
कसबा पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाज नाराज झाल्याने हिंदू महासंघाने भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे मंगळवारी कसबा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. त्यांनी आज केसरीवाडा येथे जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली. तत्पूर्वी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही आज सकाळी टिळक कुटुंबीयांची भेट घेत मुक्ता टिळक यांची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.