Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईहून अलिशान वंदे भारत एक्स्प्रेसने शिर्डीला जाताय; इथे पाहा तिकिटाचे दर

18

पुणे-नाशिक मार्गाचे दर सर्वाधिक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमधून अलिशान प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सर्व प्रवाशांना खिसा रिता करावा लागणार आहे. मुंबई-शिर्डी (नाशिकमार्गे) आणि मुंबई- सोलापूर (पुणेमार्गे) मार्गावरील ‘वंदे भारत’चे तिकीटदर आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत. या तिकीटदरांत आयआरसीटीसीच्या खाद्यपदार्थांचा समावेश नाही. यामुळे प्रवासात चमचमीत खाण्यासाठी आणखी पैसे भरावे लागणार आहे.

येत्या तीन दिवसांत दोन नव्या गाड्या मुंबईतून धावणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेससाठी पुण्यापर्यंत चेअर कार डब्यात ५६० रुपये तर सोलापूरसाठी ९६५ रुपये मोजावे लागणार आहेत. एक्झिक्युटीव्ह श्रेणीसाठी १,१३५ रुपये तर मुंबई-सोलापूर या संपूर्ण प्रवासासाठी १,९७० रुपये मोजावे लागतील. मुंबई-साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’चे नाशिक रोडपर्यंतचे चेअर कार तिकीट ५५० आणि शिर्डीसाठी ८०० रुपये असे आहे. एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठी अनुक्रमे ११५० आणि १६३० असे तिकीट दर असणार आहेत, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

मुंबई ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला पाच तास २० मिनिटे आणि मुंबई ते सोलापूर अंतर पार करण्यासाठी सहा तास ३० मिनिटे लागणार आहेत. यामुळे चहा आणि नाश्त्यासाठी अधिक रुपये खर्च करावे लागतील. रेल्वेने ठरवलेल्या प्राथमिक दरांमध्ये आयआरसीटीसीच्या खाद्यपदार्थांचा समावेश केलेला नाही, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

आयआरसीटीसी करतेय काय?

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसची सुरुवात होण्यास अवघे ७२ तास शिल्लक असताना ‘आयआरसीटीसी’कडून अद्याप खाद्यपदार्थ आणि त्यांचे दर निश्चित झालेले नाही.

पुण्यासाठी तीन तास

‘वंदे भारत’च्या रूपाने राज्यातील दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या शहरांना जोडणारी आणखी एक गाडी सेवेत दाखल होणार आहे. मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस दुपारी ४.१०ला मुंबईहून रवाना होणार असून पुण्यात सायंकाळी ७.१०ला पोहोचेल; तर सोलापूरला रात्री १०.४०ला मुक्कामी असणार आहे. सोलापूरहून परतीचा प्रवास सकाळी ६.०५ वाजता सुरू होणार असून, पुण्याला नऊ वाजता आणि सीएसएमटीला दुपारी १२.३५ वाजता संपणार आहे.

शिर्डी एका दिवसात

‘वंदे भारत’ सीएसएमटीहून सकाळी ६.१५वाजता रवाना होणार असून, दुपारी १२.१० वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास ५.२५ वाजता सुरू होऊन रात्री ११.१८ मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. यामुळे साई भक्तांना एका दिवसात दर्शन करून आपल्या घरी येणे शक्य होणार आहे.

‘सीएसएमटी’हून असे आहे तिकीट

(दर रुपयांत)

ठिकाण – चेअर कार श्रेणी – एक्झिक्युटिव्ह श्रेणी

पुणे – ५६० – ११३५

सोलापूर – ९६५ – १९७०

नाशिक – ५५० – ११५०

शिर्डी – ८०० – १६३०

(*खाद्यपदार्थ दरांचा समावेश नाही)

या मार्गावरील सध्याचे दर

दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस

(दर रुपयांत)

शयनयान – २७०

तृतीय वातानुकूलित – ७३०

द्वितीय वातानुकूलित -१०३५

सीएसएमटी-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस

(दर रुपयांत)

शयनयान – ३०५

तृतीय इकॉनॉमी – ६६५

तृतीय वातानुकूलित – ७२०

द्वितीय वातानुकूलित – १०००

प्रथम वातानुकूलित – १६७५

मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस

चेअर कार – ३८५

व्हिस्टाडोम – ९९५

(सर्व आकडे रुपयांत)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.