Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
घर बांधण्याचे स्वप्न तो पूर्ण करण्याच्या मार्गावर होता. घराचा पाया झाला, बांधकाम अर्ध्यावर आलं पण नियतीच्या मनात काही औरच होतं. सायंकाळी मैदानावर शारीरिक कसरत करून आनंदने फुटबॉलचा आनंद घेतला आणि पूर्णत्वाला चाललेल्या घरावर पाणी मारण्यासाठी तो रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी पोहोचला. बोअर सुरू करून पाईपने अर्ध्या बांधलेल्या भिंतीवर पाणी मारू लागला. पण कुठेतरी विजेची वायर कट झाली आणि विजेचा झटका आनंदला बसला.
बाजूला असलेल्या मित्रांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वायरची पिन ओढली तोच आनंद भिंतीवर फेकला गेला. मित्र त्याला प्रथम खासगी दवाखान्यात घेऊन गेले. पण डॉक्टरांनी त्याला तपासून सरकारी रुग्णालयात नेण्यास सांगितले. मित्र आणि नातेवाईकांनी आनंदला तात्काळ लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा मुळे उपस्थित नव्हत्या. त्यांना फोन केला तरीही त्या तब्बल दीड ते दोन तास उशिरा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्या. दुर्दैवाने तोपर्यंत आनंदने लहान भावाच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी टाकून डॉक्टरांच्या प्रतीक्षेत आपले प्राण सोडले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्व स्वप्न अधुरी ठेऊन त्याला जगाचा निरोप घ्यावा लागल्याचा आरोप नातेवाईक आणि मित्रांनी केला आहे.
जेव्हा डॉ. सुरेखा मुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या तेव्हा संतप्त झालेल्या नातेवाइकांवरच भडकल्या. विजेचा धक्का लागलेला मनुष्य जागीच मृत्यू पावतो, असंही त्या म्हणाल्याचे उपस्थितांनी सांगितलं. या प्रकारामुळे नातेवाईक आणि मित्र अधिकच संतप्त झाले. मात्र, काही नागरिकांनी मध्यस्थी केली आणि वातावरण निवळले. डॉ. सुरेखा यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आनंदचे नातेवाईक आणि मित्रांनी केली आहे. आनंदचा मृतदेह शवविच्छेदनानंतर सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आनंदवर तांबरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे आनंदच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लहान भावावर आली आहे.
पोलिसात अद्याप गुन्हा दाखल नाही
आनंदच्या नातेवाइकांसह मित्रांनी डॉ. सुरेखा मुळे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही.
निवासी आरोग्य अधिकाऱ्याची जबाबदारी?
ग्रामीण भागात किमान प्राथमिक आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकाऱ्यांनी निवासी असणे बंधनकारक आहे. डॉ. सुरेखा मुळे या पण निवासी डॉक्टर आहेत. मात्र, आनंदला आरोग्य केंद्रात दाखल केले तेव्हा त्या आरोग्य केंद्रात उपस्थित नव्हत्या. त्या तब्बल दीड ते दोन तास उशिरा पोहचल्या.