Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
यावेळी अनिल देशमुख यांनीही त्या काळातील आपले अनुभव कथन केले. माझ्याकडे समझोत्याचा प्रस्ताव होता. मी समझोता केला असता तर तुरुंगात गेलो नसतो. पण त्यावेळी मी बाहेर पडलो असतो तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वीच पडले असते. माझा साहेबांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. मी आयुष्यभर जेलमध्ये जाईन, पण समझोता करणार नाही, असे त्यावेळी सांगितले. आर्थर कारागृहात जेथे दहशतवादी कसाबला डांबले होते, तेथेच डांबून माझ्यावर तडजोडीकरता दबाव आणला, असा गौप्यस्फोटही अनिल देशमुख यांनी केला.
ईडी, सीबीआयच्या भीतीने अनेक आमदार पक्षबदल करुन गेले. माझ्यावरही सातत्याने दबाव आणला जात होता. माझ्यावर १०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. पण आरोपपत्रात माझ्यावर केवळ १ कोटी ७१ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला. माझा छळ करण्यात आला, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. अखेर न्यायदेवतेने मला न्याय दिला. न्यायालयाने माझ्याविरोधात पुरावे नसल्याचे स्पष्ट केले, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
अनिल देशमुखांनाच भाजपमध्ये यायचे होते: गिरीश महाजन
अनिल देशमुख यांच्या दाव्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर पलटवार केला. आम्ही अनिल देशमुख यांना कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता. उलट अनिल देशमुख यांनीच भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी दोनवेळा आम्हाला तसा प्रस्ताव पाठवला होता. पण ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले. अनिल देशमुख यांची आताही जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळे निर्दोष असल्याचे पुरावे आणि कागद त्यांनी ईडीला दाखवावेत, असा सल्लाही गिरीश महाजन यांनी दिला.
अनिल देशमुखांना मुंबईबाहेर जाण्याची परवानगी
विशेष सीबीआय व विशेष पीएमएलए न्यायालयाने अनिल देशमुख यांना चार आठवडे मुंबईबाहेर जाण्याची परवानगी दिली होती. यानंतर अनिल देशमुख तब्बल २१ महिन्यानंतर नागपुरात परतले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. विमानतळाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर फुलांनी सजवलेल्या गाडीतून अनिल देशमुख यांची मिरवणूक काढण्यात आली होती.