Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे, दि. १४:- जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व उच्च माध्यमिक परीक्षा व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते २५ मार्च, २०२३ रोजी ८ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) २१ फेब्रुवारी ते २१मार्च २०२३ या कालावधीत तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित केलेल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या परीसरात व त्यासभोवतालच्या १०० मीटर परिसरात परीक्षेशी संबंधित असलेले शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आदी वगळून इतर कोणत्याही खाजगी व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या परीसरात दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश संबंधित केंद्रावर परीक्षेस बसलेले परीक्षार्थी, परीक्षेसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा अधिकारी यांना लागू होणार नाहीत.
तसेच या परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरातील सार्वजनिक दूरध्वनी, एसटीडी, आयएसडी, बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्रे, ई-मेल इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, भ्रमणध्वनी, प्रसार माध्यमे अथवा तत्सम संपर्क साधने बंद ठेवावीत. परीक्षा केंद्रांवर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॉझिस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप व तत्सम इतर साधने परीक्षा केंद्रावर जवळ बाळगण्यास व परिसराचे १०० मीटर सभोवतालच्या परिसरात वापरण्यास मनाई करण्याचा आदेश लागू करीत आहे. या आदेशाचे उल्लघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८ अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे.
0000