Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपला मदत करायची पण… राज ठाकरेंचा प्लॅन मनसे नेत्याने फोडला!

17

पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पोटनिवडणुकीच्या कोणत्याही जागेवर मनसे उमेदवार देत नाही, ही पक्षाची प्रथा आहे. त्यानुसार कसबा आणि चिंचवडमध्ये उमेदवार न देता भाजपच्या समर्थनार्थ आपली ताकद उभी करण्याचा निर्धार मनसेने केला आहे. राज ठाकरेंच्या सर्व प्लॅनिंगचं गुपित मनसे नेते बाबू वागसकर यांनी फोडलं आहे. आज खासदार गिरीश बापट यांनी आजारपणाच्या कारणास्तव प्रचारातून माघार घेतल्याने भाजपचं टेन्शन वाढलं होतं. मात्र आता राज ठाकरेंचे ‘सैनिक’ भाजपच्या मदतीला धावून जाणार असल्याने उमेदवार हेमंत रासने आणि अश्विनी जगताप यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली असेल हे नक्की…

पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून राज ठाकरे यासंदर्भात मौन बाळगून होते. कसबा आणि चिंचवडमध्ये राज ठाकरे कुणाला पाठिंबा देणार? मनसेची काय भूमिका असणार? याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. पोटनिवडणूक जसजशी जवळ येत होती, तसतशी मनसेच्या भूमिकेविषयची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत होती. अगदी वेळेवर मनसैनिक ‘कामाला’ लावण्याचा राज ठाकरेंचा प्लॅन होता. पण मनसे नेते बाबू वागसकर यांनी त्याआधीच राज ठाकरेंचं गुपित फोडलं आहे.

राज ठाकरेंचं प्लॅनिंग काय?

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भात मनसे आणि भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा झाल्याची माहिती वागसकर यांनी दिली आहे. मात्र, असं असलं तरी भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही, असंही बाबू वागसकरांनी सांगितलं आहे. पोटनिवडणुकीत भाजपला मदत करण्याचा आदेश हा खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीच दिला आहे, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना शब्द पण आता प्रचारातून माघार, कसब्याचा वाघ ‘घायाळ’!
…म्हणून भाजपला साथ देण्याचा निर्णय!

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढली आहे. गेल्या सात महिन्यात राज ठाकरे आणि शिंदे फडणवीसांच्या अनेक गाठीभेटी झाल्या आहेत. राज्यातल्या विविध मुद्द्यांवरुन राज ठाकरे यांनी राज्य सरकारला पत्र लिहिली आहेत. राज्यकर्त्यांनीही राज ठाकरेंच्या पत्रांची दखल घेत त्यांना निर्णयरुपी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंची शिंदे फडणवीसांसोबतची केमिस्ट्री वेळोवेळी चर्चेत आली आहे. दुसरीकडे तोंडावर आलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत देखीलभाजप-शिंदे गटाच्या साथीने मनसे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या तिन्ही पक्षांचं सध्या उत्तम सूत जुळत असल्याने राज ठाकरेंनी पोटनिवडणुकीत भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

मनसेची मोलाची साथ मिळेल!

कसब्यात मनसेची चांगलीच ताकद आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अजय शिंदे अनेक वर्षांपासून तिथे काम करतायेत. त्यामुळे भाजपला मनसेची मोक्याच्या क्षणी ‘मोलाची’ मदत होणार आहे. तिन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली निवडणूक अगदी काँटे की टक्कर होईल. त्यामुळे प्रत्येक मत भाजपसाठी महत्त्वाचं असणार आहे. अशा परिस्थितीत मनसेचं मतदान भाजपसाठी बोनस पॉइंट असेल.

मनसेच्या साथीला भाजप, आता मविआची कसोटी लागणार

दरम्यान, कसब्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. भाजपकडून नगरसेवक हेमंत रासने तर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे मैदानात आहेत. मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचं ठरवल्याने महाविकास आघाडीला आता आणखी जोर लावावा लागणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.