Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे दि.१६ :- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकी निमित्ताने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत असून निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. विविध पथकांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक पूर्वतयारी करण्यात येत आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली असून पथकांमार्फत आतापर्यंत २४ फलक, ३८९ पोस्टर्स व ६६ झेंडे काढण्यात आले आहेत. पोलिसांमार्फत विविध ९ तपासणी नाक्यांवर दररोज ३ पाळ्यांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात येत असून आजपर्यंत ९ हजार ८२५ रुपये किमतीची सुमारे १८३ लिटर दारू हस्तगत करण्यात आली.
उमेदवारांच्या सुविधेसाठी कसबा पेठ मतदारसंघाच्या गणेश कला क्रीडा रंगमंच येथील निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना केली आहे. विविध पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार यांनी केलेल्या मागणीनुसार या कार्यालयामार्फत आजपावेतो ५ सभा, ६६ पदयात्रा, १० वाहन परवाने, ७ तात्पुरती पक्ष कार्यालये/स्टेज इत्यादीसाठी परवाना पत्र देण्यात आले आहेत. कार्यालयातील तक्रार निवारण कक्षाकडे ९ आणि सीव्हीजील ॲपवर एकूण ४८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्वच तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
उमेदवारांचे प्रचार खर्चाबाबतदेखील स्वतंत्र कक्षाची स्थापना केली असून याबाबत दररोज उमेदवारांच्या खर्चाचा तपशील या कार्यालयाकडे प्राप्त होत असून त्याचा लेखाजोखा घेण्यात येत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण यंत्रणा दक्षता घेत असून मतदानाची पूर्वतयारी करण्यात येत आहे. संपूर्ण प्रक्रीयेत निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, निवडणूक पोलीस निरीक्षक अश्विनीकुमार सिन्हा, निवडणूक खर्च निरीक्षक मंझरूल हसन यांचे मार्गदर्शन होत आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनीदेखील आढावा बैठका घेऊन निवडणूक प्रक्रीयेविषयी मार्गदर्शन केले आहे, अशी माहिती २१५-कसबा पेठ मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे.