Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सिन्नर तालुक्यातील मर्हाळ येथे ऊसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. याची माहिती वन विभागाला कळविण्यात आली होती. वनविभागाच्या कर्मचार्यांनी माय-लेकरांची ताटातूट न होऊ देता मानव वन्यजीव संरक्षक विभाग आणि इको फाऊंडेशनच्या सहकार्यातून दोन्ही बछड्यांना मादीच्या कुशीत पोहचवले आहे. अखेर ३० तासाच्या प्रतिक्षेनंतर बछडे मादीच्या कुशीत विसावले आहेत. मर्हाळ येथे पांगरी-मर्हाळ शिव रस्त्यालगत प्रदीप एकनाथ आढाव यांच्या शेतात मंगळवारी ऊसाची तोड सुरु असताना उसाच्या शेतात बिबट्याचे दोन ८ ते १० दिवसांचे नवजात बछडे आढळले.
उसाच्या शेतात काम करत असलेल्या उसतोड मजुरांनी बिबट्याचे बछडे पाहून मादी जवळपास असावी या भितीने शेताच्या बाहेर पळ काढला आणि या घटनेची माहिती आढाव यांना दिली. माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून दोन बछडे आढळून आल्याची वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने या दोन्ही बछड्यांना दूध पाजले व उसाच्या शेतात भाजीपाल्याच्या कॅरेट मध्ये ठेवले आणि ट्रॅप कॅमेरा लावला.
सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मादीने कॅरेटमध्ये ठेवलेल्या दोन बछड्यांपैकी एकाला उचलून नेले. दुसर्या बछड्यालाही घेऊन जाईल या आशेवर वनविभागाचे पथक रात्री १.३० वाजेपर्यंत घटनास्थळी थांबून होते. मात्र, तोपर्यंत मादीने दुसरा बछडा नेला नाही. त्यामुळे वनकर्मचार्यांनी इको फाऊंडेशन व मानव वन्यजीव संरक्षक विभागाच्या सहकार्याने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले व परतीचा मार्ग धरला.
दरम्यान, काल सकाळी पुन्हा वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असता बछडा तिथेच असल्याने पथकाने या बछड्याला घेऊन नांदूरशिंगोटे येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. तेथे या बछड्याला दूध पाजले तसेच खायला दिले. सायंकाळी ५.३० वाजता पुन्हा घटनास्थळी जाऊन बछड्याला कॅरेटमध्ये ठेवले. त्यानंतर १५ मिनिटांनी मादी आली व दुसर्या बछड्याला घेऊन गेली. काही तासानंतर मादी आपल्या बछड्यांना घेऊन जाण्याकरिता आली आणि दुरावलेल्या बछड्यांना घेऊन जातानाचा व्हिडीओ या कॅमेरात कैद झालाय.