Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक भारतीय विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी भर पडत असून, गेल्या वर्षी देशभरातून एक लाख २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या ‘व्हिसा’साठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. ही संख्या जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक असून, भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील संधी खुणावत असल्याचे स्पष्ट होते आहे.
अमेरिकेच्या मुंबई येथील वाणिज्य दूतावासाचे वाणिज्य दूत माइक हँकी यांनी गुरुवारी पुण्यातील विविध संस्थांना भेट दिली. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाणिज्य दूतावासाचे व्हिसा विभागप्रमुख जॉन बॅलाड या वेळी उपस्थित होते. या संवादात हँकी यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जगातील सर्व देशांच्या तुलनेत भारतातील विद्यार्थी अधिक उत्सुक असल्याचे नमूद केले.
सन २०२२ मध्ये अमेरिकेच्या दूतावासाकडे भारतातील एक लाख २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘व्हिसा’साठी अर्ज केला होता. यातील सर्व प्रकारची कागदपत्रे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिसा देण्यात आला असून, त्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. येत्या तीन महिन्यांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षासाठी आम्ही पुन्हा एकदा व्हिसा प्रक्रिया राबवणार असून, मार्चनंतर ही प्रक्रिया अतिशय जलदगतीने राबवली जाईल, असे हँकी यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महिला विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य देत असल्याचेही हँकी यांनी अधोरेखित केले.
‘व्हिसा’साठीची प्रतीक्षा कमी करणार’
अमेरिकेत पहिल्यांदाच पर्यटनासाठी जाण्यास इच्छुक असलेल्या भारतीय नागरिकांनी व्हिसासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना पुढील अपॉइंटमेंट मिळेपर्यंत ५०० दिवसांचा कालावधी सध्या लागत आहे. यावर आम्ही काम करीत असून, हा वेळ आणखी कसा कमी होईल, याबाबत प्रयत्नशील आहोत. अमेरिकेत शिकायला जाणारे विद्यार्थी, वैद्यकीय कारणास्तव उपचार घ्यायला जाणारे नागरिक, उद्योजक यांच्याबाबतीत जलद सुविधा देत असल्याचे जॉन बॅलाड यांनी सांगितले.
‘डिसेंबरपासून तीन लाख मुलाखती’
गेल्या डिसेंबरपासून आतापर्यंत अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या तीन लाख भारतीयांना व्हिसाच्या मुलाखतीसाठी वेळ देण्यात आली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून, लवकरच करोनापूर्वी जितक्या मुलाखती घेतल्या जात होत्या. तितक्याच मुलाखती घेण्याचा आमचा विचार असल्याचे माइक हँकी यांनी सांगितले.