Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Scholarship: अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची संधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाकडून अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. याकरिता उपलब्ध असलेल्या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरिता शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केलेली आहे.
राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्य, ज्ञान उपलब्ध व्हावे, त्यांची विविध क्षेत्रात होणाऱ्या स्पर्धात्मक युगासाठी जडण-घडण व्हावी, याकरिता देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्राप्त अर्जांची छाननी करताना समाजकल्याण विभागाचे आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. समिती सदस्यांची बैठक गेल्यावर्षी १३ डिसेंबरला झाली होती. या बैठकीत निवड केलेल्या विद्यार्थ्यांपैकी पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.
…असा मिळणार लाभ
– शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेने ठरविलेले पूर्ण शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क समाजकल्याण आयुक्तालयामार्फत संस्थेला देण्यात येईल.
– विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेने वसतीगृह, भोजन शुल्क त्यांच्या आकारणीप्रमाणे पूर्ण खर्च दिला जाईल. या खर्चाची रक्कम वर्षभरात एकदाच दिली जाणार आहे.
– अभ्यासक्रमासाठीची पुस्तके, शैक्षणिक साहित्य, इतर शैक्षणिक खर्चासाठी दहा हजार रुपये प्रत्येक वर्षी दिले जातील.
– अभ्यासक्रमाच्या खर्चासाठी २०२२-२०२३ या वर्षाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व वसतीगृह भाडे, निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय खर्चाबाबत संबंधित विद्यापीठाकडून, संस्थेकडून माहिती मागवून आणि विद्यार्थ्यांच्या प्रगती व उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन संबंधित महाविद्यालय, संस्थेस रक्कम अदा केली जाणार आहे.