Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराष्ट्रावर आहे खास शिव कृपा, हे ५ पुरावे आहेत आपल्यासमोर

8

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

हिंदु धर्मानुसार अस म्‍हटलं जातं की, “वरील बारा ज्‍योर्तिलिंगाचे नावानुरुप मंत्र” जर दररोज पहाटे व सायंकाळी जपन केला तर सात जन्‍मातील झालेला पाप ज्‍योर्तिलिंगाच्‍या स्‍मरणामुळे / जप केल्‍यामुळे सर्व पापांचा विनाश होतो. या ज्‍योर्तिलिंगाचे स्मरण करूया आणि आपल्या महाराष्ट्रात किती आणि कुठे ज्‍योर्तिलिंग आहे ते पाहूया.

​घृष्णेश्वर, महाराष्ट्र

बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वराचे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. या मंदिरापासून जवळच श्रीगणेशाचे २१ आद्यपीठांपैकी एक लक्षविनायक मंदिर आहे. घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. या मंदिराला २७ सप्टेंबर, इ.स. १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला.

​त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र

​त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते. भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात .

​भीमाशंकर, महाराष्ट्र

​भीमाशंकर, महाराष्ट्र

भीमानदीच्या उगमस्थानी असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. हे मंदिर हेमाडपंती आहे. भीमा नदीचा उगम आणि महादेवाचे स्थान, म्हणून याला भीमाशंकर असे म्हणतात. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे . या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते. कोकण कडा, सीतारामबाबा आश्रम आणि नागफणी येथील लक्षवेधक ठिकाणं आहे.

​नागनाथ, महाराष्ट्र-औंढा नागनाथ

​नागनाथ, महाराष्ट्र-औंढा नागनाथ

पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधून महादेवाची स्थापना केल्याचे सांगितले जाते. हेमाडपंती शैलीचे हे नागनाथाचे मंदिर आहे. महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही, तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे, हे येथील वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या आवारात १२ ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे असून, १०८ महादेवाची मंदिरे आणि आणखी ६८ महादेवाच्या पिंडी आहेत. औंढा नागनाथ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव व तालुका आहे. आमर्दकपूर (औंढा-नागनाथ, जि. हिंगोली, ) हे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. ‘आमर्दक सन्तान’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता. हे मंदिर एका विस्तीर्ण आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी देखील या परिसरातच आहे. असं म्हणतात की, गुजराथ येथील द्वारके मध्ये स्थित नागनाथ मंदिर १२ ज्योर्तिर्लिंगापैकी एक मानले जाते. त्यामुळे या मंदिरासंबंधी संभ्रम आहे.

​वैजनाथ, महाराष्ट्र-परळी

​वैजनाथ, महाराष्ट्र-परळी

भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत आहे. वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. झारखंड येथेही वैजनाथ मंदिर असल्याचे सांगितले जाते त्यामुळे या मंदिराविषयी देखील काही मतमतांतरे आहेत.

​आरती शंकराची​

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.