Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘एमपीएससी’ची गुणवत्ता यादी जाहीर; सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात अव्वल

10

म. टा. प्रतिनिधी, पुणेः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार परीक्षेत प्रमोद बाळासाहेब चौगुले यांनी ६३३.७५ गुण मिळवून पुन्हा राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून, खुल्या गटात शुभम पाटील यांनी ६१६ गुण, तर महिला गटात सोनाली मात्रे यांनी ६०१.७५ गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवला. चौगुले गेल्या वर्षीच्या मुख्य परीक्षेतही पहिले आले होते. मात्र, अपेक्षित पोस्ट उपलब्ध नसल्याने, त्यांनी परत परीक्षा देत यश संपादन केले आहे.

‘एमपीएससी’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा ४०५ पदांसाठी घेण्यात आली होती. या परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २७ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आल्या. मंगळवारी शेवटच्या मुलाखती संपल्यानंतर, ‘एमपीएससी’ने दोन तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. किशोर राजे निंबाळकर यांनी ‘एमपीएससी’च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निकाल ताताडीने जाहीर होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. या यादीतील उमेदवारांना तीन मार्च ते १० मार्च या कालावधीत पदासाठीचे पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवता येतील. पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. मात्र, या यादीत फारसा बदल होत नसल्याने, हीच नावे अंतिम यादीत झळकण्याची शक्यता आहे. अर्जातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी कागदपत्रे पडताळणी करताना कागी उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊन उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो. सर्वसाधारण गुणवत्ता यादी विविध न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायानिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, पुण्यात शुभम पाटील यांच्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास अनेक विद्यार्थी जमले. यावेळी जोरदार फटक्यांची अतिषबाजी करण्यात आली. मात्र, रहिवाशी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने, घटनास्थळी पोलिस आले. त्यामुळे जल्लोषावर विरजण पडले.

प्रमोद चौगुलेंचा डबल बार

शेतकरी कुटुंबातील प्रमोद चौगुले यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. वडिलांनी अनेक दिवस टेम्पोचालक म्हणून काम केले. अशा खडतर असलेल्या परिस्थितीतही इंजिनीअर होऊन, राज्य सेवा परीक्षेच्या निकालात राज्यात पहिला येण्याचा मान मिरज तालुक्यातील सोनी गावातील प्रमोद चौगुलेने सलग दुसऱ्यांदा पटाकाविला आहे.

हलाखीतही स्वप्नांना पाठबळ

प्रमोद यांनी प्राथमिक शिक्षण गावात घेतले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण पलूस जवाहर नवोदय विद्यालयात पूर्ण केले, तर इंजिनीअरिंगचे शिक्षण कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली. घराची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही आई-वडिलांनी प्रमोद यांच्या स्वप्नांना पाठबळ दिले.

पदांअभावी पुन्हा प्रयत्न

आता प्रमोद विवाहित असून, त्यांना एक लहान मुलगी आहे, तर पत्नी गृहिणी आहे. प्रमोदने सुरुवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षा दिल्या. मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही. अखेर त्यांनी राज्यसेवेकडे मोर्चा वळवला आणि २०१९मध्ये पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत मजल मारली. केवळ एका गुणामुळे ते गुणवत्ता यादीत येऊ शकले नाहीत; तरीही त्यांनी न खचता पुन्हा एकदा तयारी सुरू केली. त्यानंतर पूर परिस्थिती आणि करोनाकाळातही अभ्यास करून राज्यसेवा परीक्षेच्या २०२०च्या निकालात प्रथम आले. मात्र, पोलिस उपअधीक्षक आणि उपजिल्हाधिकारी ही पदे तेव्हा उपलब्ध नसल्याने, त्यांनी परत तयारी करून राज्यसेवा २०२१ परीक्षा दिली. आता पुन्हा या परीक्षेत राज्यातून पहिला आला आहे.

राज्यसेवेत यश मिळवायचे असेल, तर तुम्ही अभ्यासात सातत्य राखले पाहिजे. या काळात तुमचे पूर्ण लक्ष परीक्षेच्या तयारीवर असायला हवे. त्यानंतर तुम्ही यशस्वी होऊ शकाल. आज अपेक्षित पद मिळणार असल्याने, परीक्षेची तयारी थांबवत आहे.

– प्रमोद चौगुले,

उपसंचालक, उद्योग विभाग (प्रोबेशनरी ऑफिसर)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.