Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईतील मराठी शाळा एकापाठोपाठ एक बंद, शिक्षकांची ६४ टक्के पदे रिक्त

5

मुंबई : मुंबईतील मराठी शाळा एकापाठोपाठ एक बंद पडत असताना मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या पदांचीही रिक्तता वाढते आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी शिक्षकांची तब्बल ६४ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने माहितीच्या अधिकारात दिली आहे. मराठी पाठोपाठ उर्दू ३७ टक्के, हिंदी २६ टक्के, गुजराती २३ टक्के तर फक्त १४ टक्के इंग्रजी शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे माहिती देण्यात आली आहे.

मराठी माणसांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवून इंग्रजी शाळांची वाट धरली आहे. त्याचा मोठा फटका मराठी शिक्षण संस्था आणि शिक्षकांना बसला आहे. मुंबईत गेल्या काही वर्षांपासून एकापाठोपाठ एक मराठी शाळा बंद पडत असल्याचे वास्तव आहे. गेल्या १० वर्षांत मुंबई महापालिकेच्या तब्बल ११० मराठी शाळांना टाळे लागले असून ४७ हजार विद्यार्थ्यांनी शाळा सोडली आहे, अशी माहिती भाजपचे आमदार अमित साटम यांनी सहा महिन्यांपूर्वी पालिकेच्या शिक्षण विभागातून मिळवली आहे. त्या पाठोपाठ ‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशन’चे जितेंद्र घाडगे यांनी मराठीसह इतर भाषांतील शिक्षकांची रिक्त पदांची माहिती पालिकेतून मिळवली आहे.

मुंबईत सन २०१२-१३मध्ये पालिकेच्या ३८५ मराठी शाळा होत्या. त्यात ८१ हजार २१६ विद्यार्थी होते. २०२१-२२मध्ये २७२ शाळा उरल्या असून ३४,०१४ विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. गेल्या १० वर्षात ११० मराठी शाळा बंद पडल्या असून ४७ हजार २०२ विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आल्याची माहिती अमित साटम यांना देण्यात आली आहे.

गेल्या दहा वर्षांत म्हणजे २०१२पासून मराठी शाळांतून प्रत्येक वर्षी पाच ते दहा हजार विद्यार्थी गळती होत असल्याचे तर २०१४/१५ नंतर शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे पालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पालिकेचे दुर्लक्ष

एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना व शिक्षकांची पदे शिल्लक असताना गेल्या दहा वर्षांपासून व्हर्च्युअल क्लासरुम जोरात सुरू आहेत. पालिका या क्लासरूमवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र मराठी शाळांकडे दुर्लक्ष करत असल्याचे मत घाडगे यांनी व्यक्त केले आहे.

व्हर्च्युअल क्लासरुमचे परफॉर्मन्स ऑडिट व्हावे
ही रिक्त पदे भरली तर मुंबईतील हजारो बेरोजगार शिक्षक तरुणांना रोजगाराची संधी मिळेल. व्हर्च्युअल क्लासरूम प्रभावीपणे काम करते की नाही, हे तपासण्यासाठी त्याचे परफॉर्मन्स ऑडिट होणे गरजेचे आहे, अशी मागणी घाडगे यांनी पालिकेकडे केली आहे.

माध्यम- मंजूर शिक्षक पदे- कार्यरत पदे- रिक्त पदे- टक्के

मराठी ३२१३- ११५४- २०५९- ६४

हिंदी २८२१- २०८०- ७४१- २६

उर्दू ३२२५- २०१८- १२०६- ३७

गुजराती ४८५- ३७२- ११३- २३

इंग्रजी ९६१- ८२०- १४१- १४

…..

मराठी शाळांची घसरण

वर्ष शाळांची संख्या विद्यार्थी संख्या

२०१२-१३ : ३८५- ८१,२१६

२०१३-१४ : ३७५- ६९,३३०

२०१४-१५ : ३६८- ६३,३३५

२०१५-१६ : ३५०- ५८,६३७

२०१६-१७ : ३२८- ४७,९४०

२०१७-१८ : ३१४- ४२,५३५

२०१८-१९ : २८७- ३६,५१७

२०१९-२० : २८३- ३५,१८१

२०२०-२१ : २८३- ३३,११४

२०२१-२२ : २७२- ३४,०१४

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.