Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

परीक्षेपूर्वीच बारावीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल; पेपर फुटीप्रकरणी विधानसभेत पडसाद

30

म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात एका परीक्षा केंद्रावर बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फुटल्याची चर्चा रंगली. ही प्रश्नपत्रिका परीक्षेच्या अर्ध्या तासापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली. याप्रकरणी शिक्षण विभागाकडून सिंदखेड राजा पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. पेपर नेमका कुठे फुटला याची पोलिस आणि सायबर विभाग चौकशी करणार आहे.

असा आहे प्रकार

शुक्रवारी, ३ मार्च रोजी बारावीचा गणिताचा पेपर होता. सिंदखेड राजा येथे पेपर सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर बारावीचा पेपर व्हायरल झाला. वृत्तवाहिनीवर बातमी झळकताच गटशिक्षणाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी सर्व केंद्रांना भेट देऊन सुरक्षा वाढवली. गटशिक्षणाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी सर्व केंद्रावर भेट देऊन सर्व परीक्षा केंद्रांवर कडक तपासणी करण्यात आली. पेपर फुटल्याची माहिती मिळतात शिक्षण पर्यवेक्षक जगन्नाथ मुंडे यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील परीक्षा केंद्राची पाहणी करून पेपर कुठे फुटला याची चौकशी केली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने पेपर फोडल्याची तक्रार शिक्षण पर्यवेक्षक जगन्नाथ मुंडे यांनी सिंदखेड राजा पोलिसांत दिली आहे.

उत्तरपत्रिका घेऊन विद्यार्थी पळाला

छत्रपती संभाजीनगर : लघुशंकेला जाण्याचे कारण सांगून बारावीच्या परीक्षेदरम्यान एक विद्यार्थी उत्तरपत्रिका घेऊन पळून गेल्याची घटना येथील एका परीक्षा केंद्रावर शुक्रवारी घडली. विद्यार्थी पळाल्यावर पर्यवेक्षिकेने आरडाओरडा केला. विद्यार्थ्याच्या बाकावर प्रश्नपत्रिका होती व उत्तरपत्रिकेचे केवळ १३ क्रमांकाचे पान होते. पोलिसांनी शोध घेऊन त्याला एका अभ्यासिकेतून ताब्यात घेतले. परीक्षा केंद्रातील बाथरूममध्ये पाणी नसल्याने आपण अभ्यासिकेत आलो, उत्तरपत्रिकेची पाने आपण फाडली नाही, असे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

‘राज्य सरकार चौकशी करणार’

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील बारावी गणिताच्या पेपरफुटीची राज्य सरकार चौकशी करणार आहे, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच गणिताचा पेपर फुटला. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही परीक्षांमधील चुकांवर ताशेरे ओढले. इंग्रजी, हिंदीच्या पेपरमध्ये झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला, असे त्यांनी नमूद केले. या आरोपांना उत्तर देताना सरकार पेपरफुटीची चौकशी करेल, असे विखे-पाटील म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.