Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठवाडा विद्यापीठ उभारणार ‘प्री- कॅडेट ट्रेनिंग सेंटर’

10

छत्रपती संभाजीनगर : संरक्षण दलात करिअरच्या दृष्टिकोनातून तरुणाईचा वाढता कल, संधी लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ‘प्री- कॅडेट ट्रेनिंग सेंटर’ सुरू करण्याचा विचार करीत आहे. आगामी वर्षात हे सेंटर सुरू होऊन विद्यार्थ्यांना संरक्षण दलाशी निगडित अभ्यासक्रम, प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण एकाच छताखाली दिले जाणार आहे.

करिअरबाबत तरुणाई अधिक जागरूक असल्याचे पाहायला मिळते. विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या असून, विद्यार्थी अशा क्षेत्राचा शोध घेतात. मागील काही वर्षांत संरक्षण दलातही करिअरच्या उपलब्ध संधी विचारात घेऊन तरुणाईचा कल या क्षेत्राकडे वाढला आहे.

अशा वेळी विद्यार्थ्यांना याबाबत ज्ञान अवगत व्हावे, त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठही त्या दृष्टिकोनातून पावले टाकण्याचा विचार करीत आहे. विद्यापीठ ‘प्री-आयएएस कोचिंग सेंटर’च्या धर्तीवर स्वतंत्र ‘प्री- कॅडेट ट्रेनिंग सेंटर’ सुरू करण्याचा विचार करीत आहे. या सेंटरद्वारे तिन्ही सैन्यदलांतील विविध संधी लक्षात घेऊन पदवी, पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण देण्याचा विचार विद्यापीठ करीत आहे. नुकत्याच झालेल्या अधिसभेतही याबाबत चर्चा झाली.

अधिसभा सदस्य केदार रहाणे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. विद्यापीठ प्रशासनाने अशा प्रकारचे सेंटर विचाराधीन असल्याचे म्हटले आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगरसह, जालना, बीड, धाराशिव असे चार जिल्हे येतात. सेंटर विद्यापीठ कॅम्पसमध्ये असणार की जिल्हास्तरावर असणार, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.

‘एसपीआय’ची मदत घेणार

विद्यापीठ ‘प्री- कॅडेट ट्रेनिंग सेंटर’ प्रशिक्षण सेंटर उभारताना ‘एसपीआय’ संस्थेची मदत घेणार असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. संरक्षण दलात सुमारे ६०० मराठी अधिकारी देणारी राज्यातील एकमेव सरकारी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (एसपीआय) शहरात आहे. लष्कर, नौदल, हवाई दल अशा तिन्ही सैन्यदलांत या संस्थेतून शिक्षण, प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी कार्यरत आहेत. विद्यापीठ प्रशिक्षण सेंटर उभारताना या संस्थेची मदत घेईल, असेही अधिकारी सूत्रांनी सांगितले. ‘प्री- कॅडेट ट्रेनिंग सेंटर’ याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असून, त्याचा निश्चित आरखडा तयार करण्यात येणार आहे. शिक्षण, प्रशिक्षणासह इतर कोणत्या बाबी यात असतील, त्याची रचना कशी असेल यावर लवकरच काम सुरू होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठस्तरावर अशा प्रकारचे प्रशिक्षण सेंटर नाही. आपल्या विद्यापीठाने यासाठी पुढाकार घेऊन अशा प्रकारचे सेंटर सुरू केले, तर संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल. मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणात तरुण या क्षेत्रात करिअरच्या दृष्टिकोनातून तयारी करतात. त्यांना शिक्षण, प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होईल. विद्यापीठ प्रशासन याबाबत सकारात्मक दिसते.
– केदार रहाणे, अधिसभा सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.