Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

श्रीराम नवमी २०२३: म्हणा रामाचा पाळणा आणि आरती

8

मर्यादा पुरुषोत्तम, अयोध्येचा आदर्श राजा, सत्यवचनी, भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२ वाजता झाला. अलौकिक, दिव्य पुरुष आणि रघुकुलदीपक असलेल्या श्रीरामांच्या नावाने ही तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते. वाचा श्रीरामाचा पाळणा आणि श्रीरामाची आरती…रामाचा पाळणा

बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना ।
निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥

पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी ।
पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥

रत्नजडित पालख । झळके अमोलिक ।
वरती पहुडले कुलदीपक । त्रिभुवननायक ॥२॥

हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।
पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकार ॥३॥

विश्‍वव्यापका रघुराया । निद्रा करि बा सखया ।
तुजवर कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ॥४॥

येऊनि वसिष्ठ सत्वर । सागे जन्मांतर ।
राम परब्रहा साचार । सातवा अवतार ॥५॥

याग रक्षुनिया अवधारा । मारुनि रजनीचरा ।
जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥

पर्णिले जानकी सुरुपा । भंगुनिया शिवचापा ।
रावण लज्जित महाकोप । नव्हे पण हा सोपा ॥७॥

सिंधूजलडोही अवलीळा । नामे तरतील शिळा ।
त्यावरी उतरुनिया दयाळा । नेईल वानरमेळा ॥८॥

समूळ मर्दूनि रावण । स्थापिल बिभीषण ।
देव सोडविले संपूर्ण । आनंदले त्रिभुवन ॥९॥

राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला ।
दास विठ्ठले ऐकिला । पाळणा गाईला ॥१०॥

रामाची आरती

उत्कट साधूनि शिळा सेतू बांधोनि
लिंगदेह लंकापूर विध्वंसोनि
कामक्रोधादिक राक्षस मर्दुनि
देह-अहंभाव रावण निवटोनि
जय देव जय देव निजबोधा रामा
परमात्मे आरती, सद्भावे आरती, परिपूर्ण कामा ।। धृ.।।

प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला
लंकादहन करूनि अखयां मारिला
मारिला जमुमाळी भुवनी त्राटिला
आनंदाची गुढी घेऊनियां आला ।।१।।

निजबळें निजशक्ति सोडविली सीता
म्हणूनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा
आनंदें ओसंडे वैराग्य भरता
आरती घेऊन आली कौसल्यामाता ।।२।।

अनाहतध्वनी गर्जती अपार
अठरा पद्में वानर करिती भुभुःकार
अयोध्येसी आले दशरथकुमार
नगरीं होत आहे आनंद थोर ।।३।।

सहज सिंहासनीं राजा रघुवीर
सोहंभावे तया पूजा उपचार
सहजांची आरती वाद्यांचा गजर
माधवदासा स्वामी आठव न विसर
जय देव जय देव निजबोधा रामा
परमात्मे आरती, सद्भावे आरती, परिपूर्ण कामा ।। ४।।

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.