Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
RR vs-PBKS : हेटमायर, जुरेलचे प्रयत्न वाया, नॅथन एलिसच्या झंझावाती गोलंदाजीने पंजाबचा राजस्थानवर थरारक विजय
सलामीवीर कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांच्या अर्धशतकांनी पंजाब किंग्जने मोठी धावसंख्या उभारली. धवनने ५६ चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ८६ धावा करण्याबरोबरच प्रभसिमरन (३४ चेंडूत ६०, सात चौकार, तीन षटकार) सोबत पहिल्या विकेटसाठी ९ आणि जितेश शर्मा (२७) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रभसिमरनने डावाच्या दुसऱ्या षटकात केएम आसिफच्या चेंडूवर षटकार खेचून आपली क्षमता दाखवली. त्यानंतर वेगवान गोलंदाजाच्या पुढच्या षटकात तीन चौकार आणि एका षटकारासह १९ धावा जोडल्या. धवननेही ट्रेंट बोल्टला सलग दोन चौकार ठोकले. प्रभासिमरनने अश्विनला सलग दोन चौकार मारून पाचव्या षटकात संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. पॉवरप्लेमध्ये पंजाबने एकही विकेट न गमावता ६३ धावा केल्या. प्रभसिमरनने आयपीएलचे पहिले अर्धशतक अवघ्या २८ चेंडूत पूर्ण केले. प्रभासिमरनने बोल्टवर आणखी एक षटकार मारला पण तो होल्डरच्या चेंडूवर जोस बटलरद्वारे झेलबाद झाला.
धवनच्या फटक्यामुळे भानुका जखमी
धवनने मारलेला चेंडू उजव्या हाताला लागल्याने भानुका राजपक्षे अवघी एक धाव घेतल्यानंतर दुखापतग्रस्त झाला. जितेश शर्माने १२ व्या षटकात चहलला दोन चौकार मारून संघाचे शतक पूर्ण केले, त्याच षटकात धवननेही चेंडू दर्शकांमध्ये भिरकावला. धवनने चहलला सलग दोन चौकार मारून ३६ चेंडूत ४८ वे आयपीएल अर्धशतक पूर्ण केले. त्याने आयपीएलमध्ये ५० पेक्षा जास्त धावा ५० वेळा केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहलीनंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
जितेशने मात्र चहलच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रियान परागला सीमारेषेवर झेलबाद केले. ड्वेन ब्राव्होनंतर चहल हा आयपीएलमधील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्यानंतर अश्विनने सिकंदर रझाला (०१) बोल्ड केले पण धवनने शेवटच्या षटकात काही चांगले शॉट्स खेळले. राजस्थानकडून जेसन होल्डरने २ तर चहल आणि अश्विनने १-१ बळी मिळवला.
हेटमायर आणि जुरेल यांची तुफानी फलंदाजी
प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने सातत्याने विकेट गमावल्या. जोस बटलरच्या जागी सलामीला आलेल्या अश्विनला खातेही उघडता आले नाही. डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणारा यशस्वी ११ आणि जोस बटलर १९ धावांवर बाद झाले. संजू सॅमसनने २५ चेंडूत ४२ तर रियान परागने १२ चेंडूत २० धावा केल्या. पण देवदत्त पडिक्कल खेळपट्टीवर झुंजत राहिला. त्याने २१ धावा करण्यासाठी २६ चेंडूंचा सामना केला.
शेवटच्या ४ षटकांत राजस्थानला विजयासाठी ६९ धावांची गरज होती. ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर क्रीझवर होते. दोघांनी १७व्या षटकात १६, १८व्या षटकात १९ आणि १९व्या षटकात १८ धावा केल्या. सॅम कॅरेनविरुद्ध त्याला शेवटच्या षटकात १९ धावा द्याव्या लागल्या. मात्र अचूक गोलंदाजीसमोर राजस्थानला केवळ १० धावा करता आल्या. पंजाबने हा सामना ५ धावांनी जिंकला. नॅथन एलिसने ३० धावा देत बटलर, सॅमसन, रियान पराग आणि पडिक्कल यांची विकेट घेतली.