Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

MU BA Exam:परीक्षा क्रमांक जुळेना, उत्तरपत्रिका मिळेना!

9

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबई विद्यापीठाला ‘बीए’ अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची जुळवणी करताना नाकीनऊ आले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि परीक्षा क्रमांक याची जुळणी होत नसल्याने विद्यापीठाला प्रत्येक विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका स्वतंत्रपणे शोधावी लागत आहे. निकालाला आधीच १५० दिवस उलटून गेले असताना अद्याप उत्तरपत्रिकांची शोधाशोध संपलेली नाही. त्यातून बीएच्या पाचव्या सत्राचा निकाल लागण्यास आणखी काही कालवधी लागणार आहे.

परीक्षा ऑक्टोबर २०२२मध्येच
विद्यापीठाने ‘बीए’ अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली होती. त्याचा निकाल ४५ दिवसांत म्हणजेच डिसेंबर २०२२मध्ये लागणे अपेक्षित होते. मात्र मार्च उलटून गेल्यानंतरही अद्याप ‘बीए’ पाचव्या सत्राचे निकाल लागलेले नाहीत. विद्यापीठाकडून उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. करोनामुळे कॉलेजांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्याची माहिती विद्यापीठाला वेळेत कळवली नाही. त्यातून काही विद्यार्थ्यांच्या नोंदी सापडण्यास अडचण येत आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या हजेरीपत्रकाची योग्य पद्धतीने नोंद झालेली नाही. त्यातच विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर चुकीचा परीक्षा क्रमांक नोंदवल्यानेही त्यांची माहिती ऑनलाइन यंत्रणेत सापडण्यास अडचण येत आहे. त्यातून काही विद्यार्थ्यांचे निकाल तयार असले, तरी अन्य काही विद्यार्थ्यांचे निकाल तयार होऊ शकले नाहीत. हा आकडा काही हजारांमध्ये असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. मात्र अधिकारी यावर तोंड उघडण्यास तयार नसून केवळ गुणपत्रिका तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगत आहेत.

सध्या करोनानंतर विद्यापीठाचा कारभार गोंधळात सुरू असून एक गोंधळ निरस्तरला की दुसरा समोर येत आहे. त्यामुळे यातून बाहेर पडून परीक्षा विभागाचा कारभार सुरळीत करण्यासाठी आणखी काही शैक्षणिक सत्र जाणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यातच विद्यापीठाने आता १२ एप्रिलपासून ‘बीए’च्या सहाव्या सत्राची परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. त्यातून पाचव्या सत्रात विद्यार्थी काही विषयात अनुत्तीर्ण झाले असल्यास त्यांची फेरपरीक्षा कधी घ्यायची असा प्रश्न पडल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

बीएची परीक्षा सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील १२०० ते १३०० विद्यार्थ्यांची माहिती जुळत नसल्याने प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती स्वतंत्रपणे भरावी लागत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच हे काम लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी नमूद केले.

खासगी यंत्रणा अकार्यक्षम
विद्यापीठाकडे खासगी यंत्रणेद्वारे ऑनलाइन पेपर तपासणीपासून ते गुणपत्रिका तयार करण्याची व्यवस्था आहे. मात्र या खासगी यंत्रणेची व्यवस्था कार्यक्षम नसल्याने कर्मचाऱ्यांनाच हाताने कामे करावी लागत आहेत. ही शोकांतिका आहे. याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होत नसल्याने पुन्हा-पुन्हा गोंधळ उडत असून निकालाला विलंब होत आहे, अशी टीका माजी अधिसभा सदस्य संजय वैराळ यांनी व्यक्त केले.

दरम्यान यावर विद्यापीठाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.