Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राज्यातील विनाअनुदानित कला कॉलेजांनी अनुदानाची मागणी करीत शासकीय उच्च कला परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. याचा फटका कला कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बसत असून राज्यातील निम्म्या कॉलेजांमध्ये परीक्षा सुरू, तर निम्म्या कॉलेजमधील विद्यार्थी परीक्षेपासून वंचित आहेत. त्यामुळे सुमारे दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
राज्यातील कला कॉलेजांच्या वार्षिक परीक्षांना ३१ मार्चपासून सुरुवात झाली आहे. ११ एप्रिलपर्यंत या परीक्षा चालणार आहेत. मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक पदविका, इंटर रेखा व रंगकला, डिप्लोमा इन फाइन आर्ट, अप्लाइड आर्ट आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र अनुदानाच्या प्रश्नावर स्पष्टता येईपर्यंत परीक्षा घेण्यास विनाअनुदानित कला कॉलेजांनी नकार दिला आहे.
‘कॉलेजच्या बहिष्कारामुळे परीक्षा होत नाही. आम्ही दररोज कॉलेजमध्ये जात आहोत. मात्र काहीच होत नाही. कला संचालनालयाने जवळच्या केंद्रावर परीक्षा द्यायला सांगितले आहे. मात्र परीक्षा सुरू असलेले केंद्र पुण्यात आहे. त्यामुळे दरदिवशी साताऱ्याहून पुण्याला परीक्षा देण्यासाठी जाणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढावा’, अशी मागणी विद्यार्थी अजित साळुंखे याने केली.
‘कला कॉलेजांनी या परीक्षेवर बहिष्कार घातल्याने सुमारे ६० परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत नसल्याची स्थिती आहे. कला संचालनालयाने कॉलेजांचा अनुदानाचा प्रस्ताव वेळेत राज्य सरकारकडे सादर न केल्याने हा प्रश्न उद्भवला आहे. आता अर्ध्या विद्यार्थ्यांची परीक्षा होत नसल्याची स्थिती आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा कधी घेतली जाणार हा प्रश्न आहे’, असे अमरावती येथील मॉडर्न आर्ट कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय कुरे म्हणाले.
‘हा प्रश्न सुटावा यासाठी सरकारी पातळीवर कोणतीही हालचाल होत नसल्याने अनेक कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सरकारने यावर तोडगा काढून विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा’, अशी मागणी दादर येथील मुद्रा कला कॉलेजचे संस्थाचालक नितीन जाधव यांनी केली आहे. ‘सध्या अतिशय तुटपुंज्या शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागत आहे. मात्र त्याचवेळी सरकारकडून अनुदान मिळत नाहीये. या परिस्थितीत संस्था चालविणे शक्य नाही. त्यातून कला कॉलेजला किमान २६ हजार रुपये फी आकारण्याची परवानगी द्यावी किंवा अनुदान लागू करावे’, अशी मागणी कला महाविद्यालय महाराष्ट्र संघाचे अध्यक्ष भरत बोराटे यांनी केली.
इशारा कुचकामी
ज्या कला कॉलेजकडून परीक्षेवर बहिष्कार घातला जाईल तेथील विद्यार्थ्यांनी जवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावी, अशी सूचना कला संचालनालयाने केली आहे. मात्र ही केंद्रे दूर असल्याने सद्यस्थितीत हा पर्यायही विद्यार्थ्यांसाठी तितकासा फायदेशीर ठरला नसल्याची स्थिती आहे. तसेच जे कला कॉलेज परीक्षा घेणार नाही, त्या कला संस्थेत पुढील शैक्षणिक वर्षापासून कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश देता येणार नाही, असा इशाराही कला संचालकांनी परिपत्रक काढून दिला आहे. मात्र त्यानंतरही बहिष्काराचे सत्र सुरूच असून यावर तोडगा निघाला नसल्याची स्थिती आहे.