Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे,दि.०९:- तरुणाईमध्ये जुन्या गाड्यांचे असलेले आकर्षण…. विल्थ सेल्फीसाठी लागलेली चढओढ… गाडी चालण्यासाठी सज्ज झालेले ज्येष्ठ नागरिक आणि रॅली दरम्यान नागरिकांनी केलेले उत्स्फुर्त स्वागत अशा उत्साहात विंटेज व क्लासिक कार्स रॅलीला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. दरम्यान, पुण्याचे मा.व पहिले महापौर कै. बाबुराव सणस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विंटेज कार ट्रॉफी रवी अवेलु यांच्या फोर्ड व्ही 8 या गाडीला तर क्लासिक कार पुरस्कार योहान पुनावाला यांच्या 1948 च्या बेंटल मार्क व्हीआय या गाडीला देण्यात आला.
विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया क्लब आणि रेस कोर्स टर्फ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विंटेज अँड क्लासिक कार्स, मोटारसायकल व स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे प्लॅग ऑफ आणि पारितोषिक वितरण अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता व पुणे शहर सहपोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरडब्ल्युआयटीसीचे अध्यक्ष सुरेंद्र सणस, विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया क्लबचे चेअरमन नितीन डोसा, रॅलीचे आयोजक व म्युझियमचे सुभाष सणस, योहान पुनावाला, झहीर वकील, धनंजय बदामीकर, वि.सी.सी.आयचे पदाधिकारी व विंटेज कार्सचे मालक उपस्थित होते. याप्रसंगी सुभाष सणस यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
ही रॅली रेसकोर्स टर्फ क्लब येथून सुरुवात होऊल गोळीबार मैदान – सारसबाग – दांडेकर पुल – लाल बहादूर शास्त्री मार्ग – गरवारे पूल – कृषी महाविद्यालय उड्डाणपूल – जुना बाजार रोड – जिल्हा परिषद – हॉलीवूड गुरुद्वारा रोडमागे पुन्हा टर्फ क्लब येथे समाप्त झाली. या रॅली दरम्यान, प्रत्येक चौकाचौकात नागरिकांनी टाळ्या वाजवुन स्वागत केले. रस्त्यावरुन जाणार्या वाहनांनीही थांबुन या रॅलीचा आनंद लुटला. तसेच, पुणेरी पगडी घालुन पारंपारिक वेशामध्ये काही कार्सचे मालक या रॅलीत सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये अतिशय मौल्यवान जुन्या 70 ते 80 विंटेज व क्लासिक कार्स आणि सुमारे 30 ते 40 विंटेज स्कूटर्स व मोटारसायकलस सहभागी झाल्या होत्या. या रॅलीमध्ये बॉलीवूड आणि हॉलीवूड स्टार्सच्या व्हिंटेज आणि क्लासिक गाड्या तसेच सुभाष सणस यांच्या मालकीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवे, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वापरलेली कन्व्हर्टेबल इंपाला, हॉलिवूड स्टार अल पचिनो यांची मर्सिडीज बेंझ, अमिताभ बच्चन यांची व्हाइट मर्सिडीज, विनोद खन्ना यांची 2 डोअर सिल्व्हर कलर मर्सिडीज व इतर सेलिब्रिटीज यांच्या विंटेज कार्स तसेच ‘बॉबी’ फेम राजदूत मोटारसायकल अशा अनेक वाहनांचा समावेश होता.
याव्यतिरिक्त, पेबल्स बीच यूएसए विजेता एल्विसची 1933, शेखर चवरेकर यांची सर्वात जुनी कार 1919 ओव्हर लँड, 1956 ची डॉज, 1938 ची सर्वात जुनी मोटारसायकल नॉर्टन 500 आदि प्रदर्शित करण्यात आले होते. 1938 सालची नॉटन फटफटी हे विशेष आकर्षण ठरली. या रॅलीतील वैशिष्टय म्हणजे ऑस्टिन 7 ही भारतातील सर्वात जुनी रॅली चालक पुण्यातील डॉ. प्रभा नेने या 87 व्या वर्षी स्वतः सहभागी झाल्या होत्या. रोल्स रॉईस, बेंटली, मर्सिडीज बेंझ, शेवरलेट, मॉरिस कन्वर्टिबल, ऑस्टिन, फोर्ड व इतर फॉरेन कार्स यांचा यात समावेश होता. धनंजय बदामीकर, डहाणूकर, योहान पूनावाला, झहीर वकील, साबळे कुटुंब अशा अनेकांच्या संग्रहातील विंटेज व क्लासिक कार्स सहभागी झालेल्या होत्या. योहान पुनावाला यांच्या संग्रहातील 7 कार्स, साबळे परिवारातील 6 कार्स, सुभाष सणस यांच्या संग्रहातील 12 कार्स सहभागी झाल्या होत्या.