Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई : मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी मुंबई महापालिकेने ठोस पावले उचलली आहेत. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांमधील १,३०० वर्ग खोल्यांमध्ये डिजिटल वर्ग उपलब्ध केले जाणार असून, त्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेता येणार आहे.
एकीकडे शिक्षणाला प्राधान्य देतानाच दुसरीकडे मैदानी खेळांना प्राधान्य देणाऱ्या पालिकेने विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल मैदान (टर्फ) सांताक्रूझ पूर्व येथील शास्त्रीनगर पालिका शाळेत उपलब्ध केले आहे. पालिकेचे हे पहिलेच फुटबॉल मैदान आहे. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे नवीन साहित्यही खरेदी केले जाणार आहे.
पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी काही वर्षांपूर्वी आधुनिक शिक्षणाचे दरवाजे ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या यशस्वी संकल्पनेतून उघडले गेले. तसेच पालिकेच्या विद्यार्थ्यांना संगणकीय युगात बसल्या जागी ‘टॅब’द्वारे शिक्षण घेण्यासाठीही दालन उघडण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून पालिका शाळांमध्ये ‘डिजिटल वर्ग’ सुरू करण्याची चर्चा सुरू होती.
प्रत्यक्षात पालिका शाळांमध्ये ‘डिजिटल वर्ग’ सुरू करण्याची प्रक्रिया २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये पार पडली. प्रत्येकी १,३०० डिजिटल वर्ग या दोन शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येतात, असा पालिकेचा दावा आहे.
या वर्गांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. शिक्षकांनाही या वर्गांचे प्रशिक्षण देण्यात येते. डिजिटल शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षकांमार्फत शाळेतील वर्गातच दिले जाते आणि त्यासाठी इंटरॅक्टिव पॅनल (एलईडी)चा वापर केला जातो. व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, स्पीकर्स या यंत्रणांच्या साहाय्याने हे शिक्षण आत्मसात करता येते. विद्यार्थ्यांना कोडी, अॅनिमेशन, गेम्स आदी माध्यमांतून शिक्षण दिले जाते.
विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आवड वाढावी, यासाठी पालिकेने येत्या शैक्षणिक वर्षात आणखी १,३०० वर्ग डिजिटल करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तीन शैक्षणिक वर्षात एकूण चार हजार किंवा त्यापेक्षा जास्त वर्ग डिजिटल करण्याचे उद्दिष्ट होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात ते पूर्ण होत असल्याचे सांगण्यात आले.
टर्फ पद्धतीचे मैदान
मुंबई महापालिकेने क्रीडा सुविधांसाठी काही पालिका शाळांच्या मैदानाचाही विकास करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार नवीन कृत्रिमरित्या बनवलेली ‘टर्फ’ पद्धतीची मैदाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सांताक्रूझ पूर्व येथे शास्त्रीनगर पालिका शाळेच्या मैदानाचा एका सामाजिक संस्थेच्या मदतीने विकास करून टर्फ पद्धतीचे पहिले फुटबॉल मैदान विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले आहे.
या मैदानाचा संस्थेकडून विनाशुल्क विकास करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना या संस्थेकडून पाच वर्षांसाठी मोफत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षक देण्यात आला आहे. सध्या पालिकेची पाच बास्केटबॉल मैदाने आहेत. मात्र फुटबॉलचे एकही मैदान नाही. सध्या विद्यार्थ्यांसाठी ३५ ठिकाणी क्रीडा केंद्रे असून सात ठिकाणी क्रीडा संकुले आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खेळांचे साहित्य वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला असून नवीन साहित्य खरेदी केले जाणार आहे. या क्रीडा केंद्र आणि संकुलामध्ये कबड्डी, खो-खो, ज्युडो कराटे, अॅथलेटिक्स इत्यादी खेळ होतात.
शिक्षण असावे दर्जेदार
मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वर्ग, खेळांसाठी पालिका शाळांच्या मैदानांचा विकास केला जात आहे. पालिकेकडून उचलण्यात येणाऱ्या या पावलांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याकडे विशेष लक्ष पुरविले गेले पाहिजे. मैदानांच्या विकासासाठी शिक्षण विभागाकडून सामाजिक संस्थांची मदत घेतली जात असतानाच अशाच प्रकारची मदत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीही घ्यायला हवी. वर्गांना डिजिटल रुप देत असताना पाठ्यपुस्तकांतील विषय भिंतीवरही रेखाटून विद्यार्थ्यांना समजावून सांगणारा ‘बोलक्या भिंती’ हा उपक्रमदेखील होत आहे. मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने चालू आर्थिक वर्षात २४५ शाळांमध्ये तो राबवण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरच जबाबदारी देण्याचा विचार केला आहे. एकूणच शिक्षणाचा दर्जा उत्तम कसा राहिल, याकडे पालिकेने विशेष लक्ष देण्याचीही गरज आहे.